मराठी अभिमान गीतामध्ये २०० लोकांच्या समूहाचे ध्वनिमुद्रण


मुंबईच्या एकाही व्यावसायिक रेडियोवाहिनीवर एकही मराठी गाणं लागत नाही. कारण विचारलं की कळतं की ही त्या रेडियोवाहिनीची ‘पॉलिसी’ असते! भारताच्या इतर कुठल्याही शहरात नसलेली ही ‘पॉलिसी’ फक्त आणि फक्त मुंबईतच पाळली जाते. उदा. चेन्नईमध्ये तमिळ गाणी न लावण्याची ‘पॉलिसी’ – आहे का? नाही! जरा अजून खोलात शिरून विचारलं की कळतं की या रेडियोवाहिनीवर असणाऱ्या थोरल्या अधिकाऱ्यांचं मत असतं की मराठी गाणी आपल्या वाहिनीवर लावली तर आपल्या वाहिनीला ‘डाउनमार्केट’ म्हटलं जाईल!

वरील दिलेल्या माहितीने आपण उद्विग्न होत असाल आणि आपण बऱ्यापैकी सुरात किंवा अप्रतिम सुरेल गात असाल तर मराठी अभिमानगीतामध्ये सूर मिसळून मराठी भाषेत तयार होणाऱ्या जगातील या सर्वात भव्य गाण्यामध्ये आपलं योगदान नोंदवावं.

मराठी भाषेला तिच्याच भूमीत मिळणाऱ्या सावत्र वागणुकीमुळे अस्वस्थ झालेल्या कौशल इनामदार या संगीतकाराला मराठीच्या अभिमान गीताची गरज जाणवली. सुरेश भट यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात लिहिलेल्या ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताला चाल देऊन ते इतक्या भव्य प्रमाणात ध्वनिमुद्रित करायचं ठरवलं की पुन्हा मराठी ‘डाउनमार्केट’ आहे म्हणण्याची कुणाची हिंमत होऊ नये. विशेषत: मराठी लोकांमध्येच त्यांच्या भाषेबद्दल न्यूनगंड राहू नये.

४ शहरांमध्ये ध्वनिमुद्रित होत असलेलं आणि १००हून अधिक प्रस्थापित गायकांनी गायलेलं हे गाणं आता पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. या ध्वनिमुद्रणाचा शेवटचा टप्पा म्हणून दि. ५ नोव्हेंबर रोजी नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात सकाळी ११ वाजता या गीतामध्ये २००हून अधिक गायकांचं एकत्र ध्वनिमुद्रण होणार आहे.

“ज्यांना सुरात गाता येतं अशांनी आपल्या आयुष्यातला कामकाजाचा एक दिवस मराठीसाठी देऊन या गीतामध्ये आपलं योगदान द्यावं आणि या ध्वनिमुद्रणाला उपस्थित राहून या गाण्यामध्ये आपला सूर मिसळावा,” असं आवाहन कौशल इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे.

इच्छुक व्यक्तींनी मंदार गोगटे ९८२०८७७२७९ अथवा अस्मिता पांडे ९८३३३४५६८४ यांच्याशी मंगळवार दि. ३ नोव्हेंबर २००९ पर्यंत संपर्क साधावा.


 

Published in:  on ऑक्टोबर 31, 2009 at 6:35 pm प्रतिक्रिया नोंदवा

SoundClick Widgets

Published in:  on जून 2, 2009 at 7:06 सकाळी प्रतिक्रिया (१)

काही बोललीस का?

Kahi Bolalis Ka – Shubhra Kalya Moothbhar

“शुभ्र कळ्या मूठभर” या अल्बम मधलं “काही बोललीस का?” हे गाणं माझ्या भावाने, विशालने अतिशय सुंदर चित्रित केलं आहे. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी अभिनय केलेल्या या व्हिडियोची व्हिडियोग्राफी शिरीष देसाई यांची आहे आणि संकलक आहेत प्रेषित जोशी. गीत शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं आहे आणि आवाज आहेत रंजना जोगळेकर आणि ऋषिकेश कामेरकर यांचे. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे.

Published in:  on मे 20, 2009 at 10:35 सकाळी प्रतिक्रिया (5)

शंकरराव बिनीवाले: एका सिंदबादची कहाणी

काही वर्षांपूर्वी मी माणिक वर्मांच्या घरी गेलो होतो. शांताबाई शेळकेंच्या कवितांना स्वरबद्ध करून ‘शुभ्र कळ्या मूठभर’ नावाचा एक अल्बम मी केला होता आणि माझी अशी तीव्र इच्छा होती की त्याचं प्रकाशन माणिक वर्मांच्या हस्ते व्हावं. माणिकबाईंनी अतिशय आस्थेने त्या अल्बम मधली सर्व गाणी ऐकली आणि अतिशय प्रेमाने येण्याचं कबूल केलं.

“गोड आहेत चाली.” त्या म्हणाल्या. “तुझ्या घरामध्ये संगीत आहे का?” त्यांनी प्रश्न केला.

“माझे आजोबा व्हायोलीन वाजवायचे.” मी उत्तर दिलं. “पुण्यात होते.”

“आमच्या काळात पुण्यात एक व्हायोलीन वादक होते. क्लासिकल आणि लाइट असं दोन्ही छान वाजवायचे. अतिशय गोड हात होता. शंकरराव बिनीवाले त्यांचं नाव.”

माझा ऊर अभिमानाने भरून आला. माणिकबाईंनी नेमकं हेच नाव घ्यावं हा अनोखा योगायोग होता.

“मी त्यांचाच नातू.” मी म्हणालो.

माझे आजोबा – शंकरराव बिनीवाले (आम्ही त्यांना अप्पासाहेब म्हणत असू) हे काळाच्या पडद्याआड जाऊन आता १४ वर्ष झाली. आणि १४ वर्षांपूर्वीच मी संगीत क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं – मी दिलेल्या पहिल्या चालीच्या रूपानं. माझ्या संगीतामधल्या वाटचाली मध्ये प्रत्येक क्षणाला मला त्यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. आज मला राहून राहून वाटतं की एक संगीतकार म्हणून त्यांचा मला सहवास आणखी जास्त काळ लाभला असता तर मी अधिक श्रीमंत झालो असतो.

अप्पासाहेब अतिशय अबोल होते. स्वत:बद्दल तर ते क्वचितच बोलायचे. हेच एक कारण आहे की आज ही मला ते एका जिग्सॉ पझल सारखे उलगडत जाताहेत. अगदी आजही त्यांचा एक जुना फोटो, किंवा त्यांच्याबद्दल एखादं जुनं वर्तमानपत्रामधलं कात्रण त्यांच्याबद्दल काहीतरी नवीन सांगून जातं. आणि त्यांच्याबद्दल प्रत्येक नवीन कळणारी गोष्ट अचंबित करणारी असते.

त्यांच्याबद्दल माझ्या सगळ्या आठवणी त्यांच्या पुण्यातल्या केसरी वाड्याच्या समोरच्या २, नारायण पेठ या निवासस्थानाशी जोडल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आणि माझा भाऊ, विशाल, आजोळी राह्यला जात असू. वाड्याच्या दरवाज्यातून आत शिरताच आम्हाला काकी (म्हणजे आमची आजी) आणि अप्पासाहेब दारात आमची वाट पाहतांना दिसले नाहीत, असं माझ्यातरी काही स्मरणात नाही. आम्ही दिसताच काकी लगबगीने घराच्या दारात लावलेल्या अळूची पानं काढायची आणि अळुवड्या करायला घ्यायची. अप्पासाहेब ‘आलात का?’ असं म्हणत स्वागत करायचे.

अप्पासाहेब अबोल असले तरी नातवंडांना गोष्ट सांगताना त्यांना स्वत:च्या अबोल स्वभावाचा विसर पडत असावा. अरेबियन नाईट्स मधल्या कथा तर ते इतके रंगवून सांगत की आमच्या डोळ्यासमोर ते सगळं वातावरण उभं होत असे. त्यांची एक लाडकी कथा म्हणजे ‘सिंदबादच्या सात सफरी’. आम्ही जितके ऐकताना रंगून जायचो तितकेच ते सांगताना त्यात हरवून जायचे. मोठा झाल्यावर मी सिंदबादची कथा नव्याने पुस्तकात वाचली पण ती मजा कधीच आली नाही.

रात्री गोष्ट ऐकता ऐकता आम्हाला गुंगी यायची. अप्पासाहेब मात्र रात्री झोपत नसत. त्यांच्या तक्क्याच्या वरती ४-५ जर्मन व्हायोलीन्स्‍ लावून ठेवली असायची… आणि एक त्यांचं लाडकं व्हायोलीन त्यांच्या शेजारी असायचं. आम्ही अंथरुणात शिरलो की ते आपल्या व्हायोलीनच्या ब्रिजला ‘म्यूट’ लावत असत, ज्याने व्हायोलीनचा आवाज अगदी मंद होऊन जाई आणि मग रात्रभर ते रियाज करत. त्यांच्या व्हायोलीनचे सूर आम्हाला अलगद झोपेच्या कुशीत नेऊन ठेवायचे.

आता इतक्या वर्षांनी मला जाणीव होतेय की अप्पासाहेबांच्या गोष्टीतला सिंदबाद हे ते स्वत:च होते.

***

१९३३.

‘कॉन्टे रोस्सो’ नावाचं एक जहाज ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडच्या दिशेने प्रवास करत होतं. मुंबई बंदरावर हे जहाज लागलं आणि त्या जहाजावर २४ वर्षांचा एक तरूण चढला. त्याच्या हातामध्ये एक व्हायोलीनची केस होती. या तरूणाची इच्छा होती, की त्याच्या हातामधलं वाद्य जगाच्या ज्या कोपऱ्यातून आलंय तिथे जाऊन त्याच्याबद्दलचं ज्ञान मिळवावं, तिथेच जाऊन ते वाद्य शिकावं. या तरूणाचं नाव होतं – शंकर गोपाळ बिनीवाले.

अप्पासाहेबांचा जन्म पुण्यातल्या सरदार बिनीवालेंच्या घराण्यातला. विसाजी कृष्ण बिनीवालेंच्या नवव्या पिढी पर्यंत पेशवेकालीन आब संपला होता. वडील लवकर गेल्यानंतर थोरले बंधु बाबासाहेब, यांच्या सल्ल्याने घरातल्याच सराफीचा व्यवसाय अप्पासाहेब पहायला लागले. पण त्यात त्यांचं मन रमेना. एके दिवशी अप्पासाहेबांना घरातल्या अडगळीत एक व्हायोलीन सापडलं. काही वर्षांपूर्वी बाबासाहेबांनीच ते खरेदी केलं होतं. अप्पासाहेबांची बोटं त्यावरून फिरायला लागली. घरातल्या मोठ्यांचा धाक वाटण्याचा तो काळ. कुणाला कळू नये म्हणून अप्पासाहेब वाड्यातल्या त्यांच्या वरच्या खोलीत व्हायोलीन वाजवत बसायचे. कुणीही न शिकवता हळू हळू आपल्याच बुद्धीने ते वाद्य आत्मसात करू लागले. मग एके दिवशी बाबासाहेबांनी त्यांचं व्हायोलीन ऐकलं आणि ते चकित झाले. कुणीही न शिकवता अप्पासाहेब उत्तमच व्हायोलीन वाजवू लागले होते. बाबासाहेब त्यांना गजाननबुवा जोशींकडे घेऊन गेले.

गजाननबुवांनी अप्पासाहेबांचं व्हायोलीन ऐकलं आणि इतके प्रभावित झाले की म्हणाले, “तुम्ही माझ्याबरोबर भारत गायन समाजात शिकवायला चला.”

पुढे गजाननबुवांनी अप्पासाहेबांना औंधला बोलावून घेतले. औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे कीर्तनकार होते. अप्पासाहेब त्यांना साथ करू लागले. सहा महीने अप्पासाहेबांनी औंध मध्ये काढल्यानंतर ते पुण्यात परतले.

पुण्यामध्ये कृष्णा थिएटर मध्ये त्या काळात मूकपट लागत असत. तिथे अप्पासाहेब या मूकपटांना पार्श्वसंगीत देऊ लागले. हळुहळू त्यांची व्हायोलीनवादक म्हणून ख्याती पसरू लागली. काही लोक अप्पासाहेबांचं वादन ऐकण्याकरिता एक चित्रपट २ – ३ वेळा पाहू लागले.

मग प्रभात फिल्म कंपनीने ‘अयोध्येचा राजा’ हा बोलपट बनवायचं ठरवलं. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी गोविंदराव टेंबे यांच्यावर सोपवली. गोविंदरावांनी अप्पासाहेबांना बोलावून घेतलं. ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटात जे व्हायोलीन आपल्याला ऐकू येतं ते अप्पासाहेबांनी वाजवलं आहे.

पण अप्पासाहेबांमधला सिंदबाद त्यांना स्वस्थ बसू देईना. पाश्चात्य देशांमध्ये भारतीय संगीताचा प्रसार करावा आणि त्याच वेळी आपण स्वत: पाश्चात्य संगीत आत्मसात करावं अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात मूळ धरून राहिली. प्रभातच्या नोकरीमधून आणि काही कार्यक्रमातून साठलेली जी काही जमापूंजी होती, त्यामधून त्यांनी ‘कॉन्टे रोस्सो’ जहाजाचं तिकीट काढलं.

अप्पासाहेब जहाजामध्ये बसले तेव्हा मनात हेतू पक्का असला तरी युरोपमध्ये उतरल्यावर आपण नक्की कुठे जाणार आहोत हे पक्कं नव्हतं. पण योगायोग असा की ऑस्ट्रेलियाचा दौरा आटपून मायदेशी परत निघालेला एक इटालियन व्हायोलीनवादक, फेदेदेन्ये मारियानो, याच जहाजावर होता. एके दिवशी अप्पासाहेब आपल्या केबिनमध्ये रियाज करत असताना त्याने ऐकले आणि त्याने त्यांची चौकशी केली. त्यांच्या वादनाने तो चांगलाच प्रभावित झाला होता. तो म्हणाला – “तुम्ही माझ्याबरोबर इटलीला चला. माझ्या घरीच रहा. तुम्ही मला भारतीय संगीत शिकवा, मी तुम्हाला पाश्चात्य संगीत शिकवतो.”

मारियानो इटली आणि फ्रान्सच्या सीमेवर असलेल्या व्हेन्तेमिलिया नावाच्या एका छोट्या गावात रहायचा. तो अप्पासाहेबांना आपल्यासोबत तिथे घेऊन गेला. सहा महिने अप्पासाहेब इटलीमध्ये राहिले आणि मारियानोकडे त्यांनी पाश्चात्त्य संगीताचे धडे घेतले. त्याच दरम्यान ते युरोपात भारतीय संगीताचे कार्यक्रम करू लागले. त्यांचं नाव आणि कीर्ति काही काळातच पसरली आणि मुसोलिनी – इटलीचा हुकुमशहा – याने अप्पासाहेबांना नेपल्सला आपल्या राजवाड्यात भेटीसाठी बोलावलं. त्या काळात मुसोलिनीची भेट म्हणजे जास्तीत जास्त ५-१० मिनिटं. पण अप्पासाहेबांशी चर्चेत मुसोलिनी चांगलाच रंगला आणि त्यांची भेट पाऊण तास रंगली. अप्पासाहेबांनी मुसोलिनीला नाट्यसंगीत आणि रागसंगीत असं दोन्ही या भेटीत वाजवून दाखवलं!

तिथून पुढे अप्पासाहेबांनी युरोपभरात अनेक कार्यक्रम केले. इटली मध्ये, फ्रान्सच्या कॅसिनो द पारी या प्रतिष्ठित थिएटर मध्ये, हॉलन्ड मध्ये, आणि इंग्लंड मध्ये. इंग्लंडमध्ये बी.बी.सी. वर सोलो व्हायोलीनचा कार्यक्रम करणारे अप्पासाहेब पहिले भारतीय कलावंत होते. लन्डन टाइम्स्‍, संडे रेफ़्री, अशा अनेक ब्रिटिश वर्तमानपत्रांतून अप्पासाहेबांबद्दल छापून येऊ लागलं. एका डच वर्तमानपत्राने तर अप्पासाहेबांना ‘ब्रिटिश-इंडियाचा येहुदी मेन्युहिन’ म्हणून संबोधलंय!

युरोपहून परतल्यानंतर या मितभाषी कलाकाराने आपल्या दौऱ्याच्या गौरवगाथा कुणाजवळ ही सांगितल्या नाहीत. आम्हाला ही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी खूप नंतर (काही गोष्टी त्यांच्या मृत्यूनंतर) समजल्या. परतल्यावर अप्पासाहेबांनी भालजी पेंढारकर आणि मो. ग. रांगणेकर या सारख्या दिग्दर्शकांच्या संस्थांमधून नोकरी केली. भालजी पेंढरकरांच्या ‘सावित्री’ या चित्रपटामध्ये व्हायोलीन हे अप्पासाहेबांनी वाजवलं आहे. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन या संस्थेत ही त्यांनी राधामाई, कुलवधु सारख्या नाटकांमध्ये व्हायोलीनची साथ केली. या खेरीज विनायकबुवा पटवर्धन, पंडितराव नगरकर, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, सुलोचना पालकर, शांता आपटे, ज्योत्सनाबाई भोळे, शाहु मोडक, अशा गायकांना साथ करत असत. याच काळात त्यांचे स्वतंत्र कार्यक्रमही होऊ लागले होते. काही काळ त्यांनी मुंबईत ऑल इंडिया रेडियो आणि ‘यंग इंडिया’ ग्रामोफोन कंपनीतही नोकरी केली.

अखेर त्यांनी सगळ्या नोकऱ्यांना रामराम ठोकला आणि पुण्याला २, नारायण पेठ च्या आपल्या राहत्या घरात व्हायोलीन वादनाचा क्लास सुरू केला. माझ्या लहानपणीपर्यंत हा क्लास चालू असल्याचं माझ्या स्मरणात आहे. कित्येक वेळा क्लासनंतर काही विद्यार्थी मागे राहून काकीशी (माझ्या आजीशी) गप्पा मारत बसायचे. जितके अप्पासाहेब अबोल तितकीच काकी बोलघेवडी होती. तरीही अप्पासाहेबांशी गप्पा मारायला येण्याऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. भा. द. खेर (काकीचे बंधू) यांच्यासारख्या पत्रकार – साहित्यिकांपासून प्रताप मुळीकांसारख्या चित्रकारांपर्यंत अनेक लोक अप्पासाहेबांच्या मित्रपरिवारात होते हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.

अप्पासाहेबांची विनोदबुद्धीही अतिशय तल्लख होती. क्वचितच कधी ते जुन्या गोष्टी सांगण्याच्या मूड मध्ये यायचे तेव्हां आम्हाला या विनोदबुद्धीची एक झलक मिळायची. ‘सावित्री’ चित्रपटाच्या चित्रीकरणाचं त्यांनी केलेलं वर्णन आठवलं की अजून मला हसू येतं. त्याकाळात प्लेबॅक पद्धत नव्हती. नटच गायचे आणि वादक ही कॅमेऱ्याच्या मागे, किंवा सेटवरच्या झाडाझुडुपात लपून आपआपली वाद्य वाजवायचे. तसे वादक ही ईन मीन तीन! तबला, ऑर्गन आणि व्हायोलीन! अप्पासाहेब सावित्रीची कथा सांगताना म्हणायचे –

“…मग यम सत्यवानाला त्याच्याबरोबर घेऊन जायचा. म्हणजे यम… त्याच्या मागे सत्यवान…. सत्यवानामागे सावित्री, सावित्रीमागे व्हायोलीन, व्हायोलीनमागे तबला…. तबल्यामागे ऑर्गन… अशी ती यात्रा निघे… आणि त्याच्या तालमी, टेक्स्‍ आणि रीटेक्स्‍!”

अप्पासाहेब कलाकार म्हणून जितके श्रेष्ठ होते, तितकेच अवलिया होते. लंडनमध्ये असताना प्रयोग म्हणून एक रेकॉर्ड त्यांनी केली होती. त्या रेकॉर्ड मध्ये एका बाजूला त्यांच्या व्हायोलीनवादनाचा कार्यक्रम तर दुसऱ्या बाजूला त्यांनी त्यांच्या आईला डिक्टेट केलेलं एक पत्र होतं! पण भारतात आल्यानंतर –

“माझी अजून साधना व्हायची आहे- ” असं कारण सांगून त्यांनी आपलं एकही ध्वनिमुद्रण होऊ दिलं नाही.

काकी – अप्पासाहेबांचं लग्न झालं तेव्हा काकी पंधरा वर्षांची होती. अप्पासाहेबांनी आधी काय केलं असेल तर तिला तबल्यावर सगळे ठेके धरायला शिकवलं! त्या काळात असं करणं म्हणजे मोठं धाडस आणि बंडखोरीच होती!

काकी आणि अप्पासाहेब

काकी आणि अप्पासाहेब

काकी आणि अप्पासाहेबांचा संसार हा अप्पासाहेबांसारखाच अबोल होता. कधी कधी दिवसभरात ते एकमेकांशी एखादं वाक्यच बोलायचे! आम्हाला याची फार गंमत वाटे. माझा भाऊ, विशाल, खूप लहान असतांना न राहून त्याने काकीला प्रश्न केला.

“तुझं आणि अप्पासाहेबांचं पटत नाही का? तुम्ही एकमेकांशी काही सुद्धा बोलत नाही!”

नंतर नंतर आम्हाला त्यांच्या नि:शब्द संवादातलं प्रेम कळायला लागलं.

१९९४ साली आषाढी एकादशीला काकी गेली आणि त्यानंतर मात्र अप्पासाहेब खचले. जीवनात रस उरला नाही. काही वर्षांपूर्वी फेशियल पॅरलिसिसच्या झटक्यामुळे त्यांचं रात्रभराचं व्हायोलीनवादन बंद झालं होतं. पण संगीत हा त्यांच्या रोजच्या आयुष्यातला भाग राहिलाच होता. खूप संगीत ऐकयचे. पण काकी गेल्यानंतर संगीतही त्यांना नकोसं व्हायचं. काकीचं वर्षश्राद्ध झालं आणि अप्पासाहेबही आठवड्याभरातच गेले.

मला अप्पासाहेबांची ही सगळी रूपं आठवतात. मितभाषी, अबोल, खूप रंगवून अलिबाबा – सिंदबादच्या गोष्टी सांगणारे, रात्रभर म्यूट लावून व्हायोलीन वाजवणारे… मी त्यांचं व्हायोलीन झोपेतच खूप ऐकलं आहे. त्यामुळे त्यांचे सूर माझ्या अंतर्मनात भिनले आहेत. सकाळी सकाळी जाग यायची तेव्हां अप्पासाहेबांची भैरवी चालली असायची. आज ही कधीतरी अचानक पहाटे जाग येते आणि अप्पासाहेबांच्या व्हायोलीनचे सूर मला ऐकू येतात. अगदी ते समोर बसून वाजवत आहेत असा भास होतो. ते सूर मनात रेंगाळत राहतात आणि मी ही सिंदबाद सारखा सात सुरांच्या सफरीवर निघतो!

कौशल श्री. इनामदार

http://kaushalsinamdar.com

http://musicandnoise.blogspot.com

http://ksinamdar.wordpress.com


बाचा-बाची! थोडी कोट्यांची प्रॅक्टिस… आणि देवदूतांचे धडे!

बाची करकारिया या टाइम्स ऑफ इन्डिया मध्ये स्तंभलेखन करतात. या एका लेखामध्ये त्यांनी बिहारच्या राहुल राज या तरूणाचा उल्लेख ‘अव्हेंजिंग एन्जल’ (सूड घेणारा देवदूत) असा केला आहे. शिवाय त्यांनी असंही भाकीत वर्तवलं आहे की महाराष्ट्रात असाच अव्यवस्थित कारभार राहिला तर लवकरच अशी वेळ येईल की एक कन्नड माणूस चुकून महाराष्ट्राच्या हद्दीत आला म्हणून बी.एस्‍.एफ्‍. त्याला जेलमध्ये टाकेल. त्यांच्या हुशारीची झलक त्यांच्या बाळ(ल) ठाकरे यांच्या नावावरून ‘बाल’कनाइजेशन अशी कोटी केली, यातही दिसते. हे पत्र मी इंग्रजीमध्ये टाइम्स्‍ ऑफ इन्डियाच्या संकेतस्थळावर टाकलं खरं पण त्यांनी ते छापलं नाही. (टाइम्सचं ऑफिस महाराष्ट्रात आहे आणि मुंबईत मराठी माणसाचं ऐकतो कोण?!) चालायचंच! आम्हाला सवय आहे त्याची! पण त्या पत्राचा हा मराठी अनुवाद :

 

प्रिय बाचीताई,

आपला टाइम्स ऑफ इन्डिया मधला लेख वाचला आणि

  1. डोळे उघडले
  2. भरून आलं
  3. महाराष्ट्राची काळजी वाटू लागली
  4. तुमचीही काळजी वाटू लागली

बाचीताई, मला वाटतं तुम्ही बिहारला शिफ्ट व्हावं. माझ्या अंदाजाने बिहार हा अधिक सुरक्षित प्रांत आहे. महाराष्ट्रासारख्या प्रतिगामी राज्यात आपण काय करता आहात? तिथे तुम्हाला एक नाही – असे अनेक ‘देवदूत’ भेटतील. मला वाटतं बाचीताई याचा तुम्ही जरा गांबीर्याने विचार करा. इथली काळजी करू नका. सूडाने पेटलेले मराठी सैतान अजिबात बिहारमध्ये तुमच्यावर चाल करून येणार नाहीत. आता इथे एखादा कन्नड येईलसुद्धा, पण मराठी माणूस ही तेच करेल अशी बिलकुल चिंता करू नका! अहो, तुम्हाला माहीत्ये का? मराठी नाटकाच्या बसेसही बेळगावात प्रवेश करू शकत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. देवाची कृपा, दुसरं काय! नाही तर किती धुडगूस घातला असता मराठी माणसाने तिथे!

बाचीताई, तुम्ही पटनात रहा. तिथे जीवन शांत आणि अहिंसक आहे. कायद्याचं राज्य आहे. तुमच्याही मनाला शांतता लाभेल आणि तुम्ही आणखीन सुंदर सुंदर कोट्या करू शकाल. तुम्ही अगदी मनमोकळेपणाने तुमच्या पारशी-हिंदीमध्ये बोलू शकाल आणि कोणी तुमची खिल्ली उडवणार नाही. तुम्हीच नाही का म्हणालात – ती देवदूतांची भूमी… बुद्ध, लालूप्रसाद, राहुल राज… किती नावं घेऊ आणि किती नको!

तुम्ही किती या मराठी सैतानांना सुधरायचे प्रयत्न केलेत! पण काय उपयोग झाला? मी स्वत: एक मराठी माणूस अंधेरीच्या एका बिल्डिंगमध्ये उत्तर भारतीय लोकांमध्ये अल्पसंख्यक होतो. पण ४ वर्ष मी तिथे त्यांच्यावर माझी दहशत ठेवली!

बाचीताई, किती हुशार आहात तुम्ही! कसं सुचतं हो तुम्हाला? बाल ठाकरे वरून बाल-कनाइजेशनची कोटी तर… अहाहा…. बुद्धिचातुर्याचा कळसच जणू! नुसतं बुद्धिचातुर्य नव्हे बाचीताई, मी तर म्हणतो यात तुमचा सुजाणपणाच लपला आहे. मला खात्री आहे बाचीताई की बॉस्नियाच्या रक्तपातामध्येसुद्धा बाळ ठाकरेचाच हात असणार. खरंच, किती सुजाण, किती चतुर आहात तुम्ही! खरं तुमच्यासारख्या बुद्धिमान स्त्रीला महाराष्ट्रासारख्या सनातन, प्रतिगामी प्रांतात राहवं लागतय हे दुर्दैव आहे. मुळात महाराष्ट्र हेच आपलं दुर्दैव आहे! हे राज्य भारतीय घटनेने बहाल केलं असलं म्हणून काय झालं? आणि काय फरक पडतो इथे यूपी बिहारमधले लोक अनाधिकृत वसत्यांमध्ये राहतात म्हणून, रिक्षा-टॅक्सीची पर्मिटं वशिलेबाजी आणि अनाधिकृत पद्धतीनं मिळवतात, वीजेचा तुटवडा असताना थोडीशी वीज चोरून जगतात…. बिचारे! ते तरी काय करणार… शेवटी घटनेने त्यांनासुद्धा हे करायचा अधिकार दिला आहे!

आणि मग राज ठाकरेसारखा उद्दाम नेता रेल्वे बोर्डाचा सवाल उठवतो! बिशाद कशी होते त्याची. गेल्या ५-६ टर्म्सपासून रेल्वे मंत्री हे बिहारमधूनच येतात हे माहित नसावं का त्याला? आज रेल्वे केवळ बिहारमुळे भारतात अस्तित्वात आहे. का त्यांनी झोन ‘ए’ सोडून इतर विभागाच्या आणि प्रांतांच्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती द्यायच्या? हे मराठी लोक स्वत:ला समजतात तरी कोण? या अशिक्षित जमातीला वाचता तरी येतं का? नोकरमाणसांची जमात हो ती! बुद्धाच्या भूमीतल्या आपल्या रेल्वे मंत्र्यांनी या अशिक्षित लोकांच्या भाषेतल्या वर्तमानपत्रांध्ये का म्हणून जाहिराती द्याव्या? महाराष्ट्राने काय दिलंय शेवटी भारताला? हां, आता हे सगळे मराठी लोक म्हणतील टिळक वगैरे, त्यांनी केसरी काढला म्हणे! आणि ते अत्रे…. त्यांचंच तर हे सैतानी डोकं… त्यांनी तर चक्क धोशाच धरला की मराठीभाषिकांना त्यांचं राज्य मिळायला हवं म्हणून… भांडून घेतला हो महाराष्ट्र! भांडकुदळ जमातच अगदी तेव्हापासून. बाचीताई, तुम्ही त्यावेळी असता तर ठणकावून सांगीतलं असतं की या जमातीला त्यांचं राज्य मिळू देऊ नका… हे लोक पुढे देशाचे तुकडे करतील… या लेखात जसं तुम्ही भाकीत केलंय तसं तेव्हां केलं असतं तर… आज हे दिवस पहायला मिळाले नसते.

तुम्ही राहुल राजला देवदूत म्हणालात, बाचीताई! खरोखर, तुम्ही पावन आहात… आणि हे मुंबईचे पोलीस! मारलं की हो त्याला! आता त्यांना वाटलं की मुंबईत मराठी माणसाचं प्रमाण कमी झालं असल्यामुळे रस्त्यावरचे लोक आणि इतर प्रवाशांमध्ये अमराठी लोकही असतील. पण इथेच ते आपला मूर्खपणा सिद्ध करतात नाही का बाचीताई? राहुलराज सारख्या देवदूताच्या उरी अमराठी लोकांबद्दलच कणव नव्हती का? बिहारहून आलेल्या माशीलाही त्याने इजा फोचवली नसती! पण हे या पोलीसांना कळायला नको? भोगा म्हणावं आता आपल्या कर्माची फळं! आणि काय केलं असतं हो असं या राहुल राजने? राज ठाकरेलाच मारलं असतं ना? आणि राज ठाकरेची गरज कोणाला आहे हो इथे?!!

खरंच, बाचीताई, तुम्ही आम्हा मराठी लोकांना किती चांगलं ओळखता! ५० वर्ष आम्ही सगळ्या इतर राज्यातून लोकांना इथे येऊ दिलं कारण आम्हाला पन्नास वर्षांनी आमचा प्रांतवादच सिद्ध करायचा होता.

बाचीताई, तुमच्या नावावर ‘बच्ची’ अशी कोटी करता येईल ना? अहो, मान्य आहे, तुमच्या बाल्कनाइजेशनच्या कोटी एवढी काही ही महान आणि जबाबदार कोटी नाही, पण मी एक साधा मराठी माणूस आहे हो. तुम्ही घ्यालच समजून!

बाचीताई, बिहारला शिफ्ट झाल्यावर नक्की कळ्वा. मी माझ्याकाही बेरोजगार मित्रांबरोबर बिहारमध्ये नोकरी शोधत येईन. तेव्हां भेटू. मग तुम्ही मला तुमच्यासारख्या भारी कोट्या करायला शिकवा. तुम्ही अशा सैतानांच्या भूमीत अडकलाय याचं फार दु:ख होतं बाचीताई… जेव्हा खरंतर तुम्हाला बिहारच्या शांतताप्रिय वातावरणात राहायला आवडेल… जिथे राहुलराजसारखे तरूण तुम्हाला झेड-सिक्युरिटी देतील! मला कल्पना आहे बाचीताई, आज महाराष्ट्र तुमच्याच लेखणीमुळे उभा राहायला आहे. तुम्हीच आम्हाला दाखवलं – देवदूत कसे दिसतात! तुमचे उपकार आहेत आमच्यावर… आम्ही ते नाही विसरणार! पण मला खरंच असं वाटतं की तुम्ही इतकं आमच्यासाठी करावं ही आमची लायकी नाही. तुम्ही जा, बाचीताई, आम्ही नाही आडवणार तुम्हाला….

 

तुमचा मराठी मित्र,

 

कौशल

© कौशल श्री. इनामदार


 

Published in:  on नोव्हेंबर 5, 2008 at 4:40 सकाळी प्रतिक्रिया (6)

मनात माझ्या

मनाला उजळून टाकते ती दिवाळी

पानी पे चमकती शामें

पुन्हा दिवाळी उंबरठ्यावर आहे. दिवाळी जवळ आली की मन नॉस्टॅल्जिक होतं. जुन्या आठवणी येरझारा घालु लागतात. मला दिवाळी आठवते ती गोव्यात घालवलेली. गोव्यातली नर्कचतुर्दशी पाहण्यासारखी असते. पणजीच्या चौकात गोव्यातल्या विविध गावांमधुन तयार करून आणलेले नर्कासुरांचे पुतळे मिरवले जातात. लहान असताना ही पणजीतली दिवाळी मी अनुभवली आहे. आमच्याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका वयस्क ब्रिटिश जोडप्याबरोबर मी पणजी फिरायला गेलो. नर्कासुराची कथा त्या जोडप्याला सांगीतली तेव्हा त्यांनाही त्या उत्सवामागची भूमिका समजली आणि मौज कळली. फेरीमधून जातांना किनाऱ्यावरच्या दिव्यांमुळे लुकलुकणारं पाणी अजून माझ्या मनात ओलावा बनून राहिलं आहे. त्या एका स्मृतीचित्राने मला बरंच काही सुचवलं आहे.

संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा

कुरळ्या लहरींमधुनी

शीळ घालतो वारा

या पाडगांवकरांच्या कवितेला चाल देतांना गोव्याची हीच रात्र माझ्या डोळ्यासमोर तरळली होती. त्यानंतर जेव्हा मी लिहिलं होतं –

पानी पे चमकती शामें

हम रहते हैं दिल को थामे

और तेरी यादों के ठंडे साये

रहते हैं मन पे छाये

तेव्हासुद्धा गोव्यातल्या दिवाळीची संध्याकाळ माझ्या मनात साठून राहिली होती. शेवटी मनाला जी उजळून टाकते ती खरी दिवाळी, नाही का?

कौशल श्री. इनामदार

एका चालीची गोष्ट

कुठल्या ही संगीतकाराला ‘हे तुम्हाला कसं सुचतं हो?’ या प्रश्नाला आयुष्यात कधी न कधीतरी सामोरं जावच लागतं. बहुतेक वेळा या प्रश्नाचं उत्तर त्या संगीतकाराकडे तयार नसतं आणि मग तो ‘यात माझं काही नाही…. ही परमेश्वराची कृपा आहे…’ किंवा या सारखं काही विनयशील असं उत्तर देऊन मोकळा होतो. मला नेहमी वाटतं की आपल्याला कधी कधी इतकं सुचतं… काही बरं, काही चांगलं, काही सामान्य आणि काही वाईट… आणि बराच काळ असा ही जातो की ज्या काळात काही सुचत देखिल नाही. तर या सगळ्याची जबाबदारी उगीचच त्या विधात्यावर का बरं ढकलावी?! आपल्या सामान्य आणि वाईट चालींची ही जबाबदारी त्याच्यावर लादणं जरा अन्यायकारकच नाही का?

पण विचार केला तर हा प्रश्न खरच अस्वस्थ करणारा आहे. एखादी चाल नेमकी कशी सुचते? काहीच अस्तित्वात नसतं आणि अचानक अवकाशाच्या पटावर सूर उमटतात आणि एक स्वरचित्र तयार होतं. पण हे सगळं खरंच इतकं अद्भुत आहे का? आपल्याच मनात घडणारी सृजनाची प्रक्रिया आपल्याला नेमकी कळू नये हे मनाला पटत नाही आणि आपण त्या चालीचा मूळ स्रोत शोधण्याच्या यात्रेवर निघतो.

देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।

सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर ते या सृजानाच्या क्षणांइतकंच सुख देऊन जातं याचा मला अनुभव आहे. अशा काही क्षणांचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडेल.

ग्रेस यांची ‘या व्याकुळ संध्यासमयीं…’ या कवितेला चाल देण्याचा योग आला. कविता वाचली आणि मी भांबावुन गेलो.

या व्याकुळ संध्यासमयीं

शब्दांचा जीव वितळतो

डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे

मी अपुले हात उजळतो

पं. यशवंत देव म्हणतात की कविता समजल्या शिवाय चाल देऊ नये. या निकषावर तर इथे कठीण होतं! पण कविता कळली नसली तरी ती जाणिवेच्या पातळीवर आपला परिणाम साधत होती. डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं, एक वातावरण मनात तयार झालं. शब्दातून थोडी हूरहूर जाणवत होती. मला पहिल्या ओळीची चाल सुचली. ती अहिर भैरव रागाच्या सुरावटीच्या आसपास घोटाळत होती. ‘डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे‘ म्हणताना मी आपसूक वरचा ‘सा’ लावला. पूर्ण चाल झाल्यावर माझ्या मनातली हूरहूर वाढली होती, ती गूढ, अनामिक बेचैनी अधिक तीव्रपणे गाण्यामधे जाणवत होती.

मी विचार करू लागलो. ही चाल मला अशीच का सुचली असेल? संध्याकाळचं गीत होतं – पण ते वाचत असताना ही माझ्या मनात अहिर भैरवची सुरावट का रूंजी घालत होती? अहिर भैरव हा पहाटे गायचा राग असून सुद्धा?

मला आठवलं की एकदा मी आजारी होतो आणि जो रात्री झोपलो तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाग आली. संधिप्रकाश होता आणि मला कळेना आता उजाडणार आहे का अंधारणार आहे. त्या क्षणांपुरता राहिलेला जो संभ्रम आणि गूढ अशी अस्वस्थता त्या अहिर भैरवच्या सुरांतुन व्यक्त होत होती. बेचैनी होती पण ती अनामिक होती, त्यावर सहज बोट ठेवता येत नव्हतं. कदाचित चालीमधे मारव्याचे सूर डोकावणं जास्त स्वाभाविक झालं असतं, बेचैनी ही जाणवली असती पण ती गूढ आणि सहजासहजी न उलगडणारी वाटली नसती. आणि सकाळचे राग संध्याकाळी ऐकताना मला कायम ही अनामिक बेचैनी जाणवत आली आहे.

‘रेन रागा’ नावाचा एक फ्युजन शो मी केला होता. त्यामधे पाऊस पडायच्या अगोदरचं चित्र एका धुनेतून व्यक्त करायचं होतं. पाचच मिनिटात चाल लागली. नंतर विचार केला तेव्हा लक्षात आलं की पाऊस पडायच्या अगोदरचं चित्र – असा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहिलं होतं… खडकाळ प्रदेश आहे… सूर्य मध्यान्हीला आलाय… लो ऍन्गल कॅमेऱ्यातुन तो आपल्याला दिसतोय… घामाच्या धारा वाहत आहेत. आणि हेमा मालिनी काचांच्या तुकड्यांवर नाचते आहे ! त्याबरोबरच सूर्य मध्यान्हीला आलाय…. असं जेव्हा आपल्या डोक्यात आलं तेव्हा आपल्याला पं. कुमार गंधर्वांनी निर्माण केलेल्या ‘मधसुरजा’ या रागाची ही आठवण झाली होती.

…. आणि आपण केलेल्या चालीवर या दोन्ही सुरावटींची छाया होती. हे आपसूक घडलं होतं. त्याचा विचार चाल देण्याच्या आधी झाला नव्हता.

असा तर्क करा. तुम्ही पावसाळ्यात कोकणात फिरायला गेले आहात. संध्याकाळ होते. तुम्हाला चहाची तल्लफ येते. तुम्हाला रस्त्यावर एक चहाची टपरी दिसते. तुम्ही गाडीतून उतरता आणि अचानक एक जोराची सर येते. तुम्ही भिजत भिजत टपरी पर्यंत जाता. शेगडीवर एक अनुभवी पातेलं आहे ज्यावर चहाचं आधण चढवलं आहे. त्यातून मस्त, गरम वाफा येत आहेत. समोर संधिप्रकाशात एक कौलारू घर दिसतंय्‍. त्यात एक कंदील पेटलाय. संपूर्ण परिसर अतिशय रम्य दिसतोय्‍. तुम्ही तो डोळ्यांत साठवून घेताय. आणि त्याच वेळी त्या चहाच्या टपरीवरचा जो रेडियो आहे, त्या मधे विविधभारती वर ‘फिरकीवाली तू कल फिर आना, नहीं फिर जाना तू अपने जबान से… कि तेरे नैना है जरा बईमान से…‘ खरं तर त्या गाण्याचा आणि त्या दृश्याचा काडीचा संबंध नसतो पण ते गाणं त्या दृश्याचा एक घटक बनून जातं.

बराच काळ उलटतो आणि तुमच्यावर एका पावसातल्या गीताला चाल देण्याची वेळ येते. तेव्हा आपसूक ‘फिरकीवाली…’ चे सूर तुमच्या सुरावटीमधे मिसळून जातात!

एका अर्थाने आपण नवीन काहीच करत नसतो. मार्क ट्वेन ने म्हटलय्‍ –

“Only Adam, when he said a good thing, knew that nobody had said it before him!”

पण तरीही वेगवेगळ्या चाली निर्माण होतच रहातात. आपल्याला त्यातलं नाविन्य जाणवत राहतं. घराघरात मटकीची उसळ होते पण चव सगळीकडची वेगळी असते कारण त्या गृहिणीच्या हाताची (काही सुखी कुटुंबांमध्ये गृहस्थाच्या!) चव त्यामधे उतरते. तसंच एखद्या गीताची चाल ही आपल्या संस्कारातून आली असेल पण आपल्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श तिला होतो आणि चाल नवीन होऊन जाते !

© कौशल श्री. इनामदार

हा लेख ‘प्रहार’ या दैनिकात ११ ऑक्टोबर २००८ रोजी छापून आला होता

हक़ीक़त ने ऐसा पक़डा गिरेबाँ

इट्स ब्रेकिंग न्यूज़ मधलं हे तिसरं गाणं मी माझ्या ब्लॉग वर अपलोड करत आहे. सोबत त्या गाण्यामागची कथा ही सांगितली आहे. आपण गाणं ऐकून आपला प्रतिसाद दिलात तर खूप आनंद होईल.

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/haqeeqat-ne-aisa-pakda-girebaan-child.html

गीत इथे डाऊनलोड करता येईल.
http://ourmedia.org/allmedia&uid=69864

इट्स ब्रेकिंग न्यूज

गेल्या आठवड्यात संगीतकार आणि गीतकार म्हणून माझा पहिला हिंदी चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला. इट्स ब्रेकिंग न्यूज हे त्या चित्रपटाचं नाव. महाराष्ट्र टाईम्स, सकाळ इत्यादि वर्तमानपत्रांनी, तरण आदर्श, कोमल नहाता यांच्यासारख्या ‘ट्रेडगुरूं’नी या सिनेमाला आपली पावती दिली. तरी काही इंग्रजी दैनिकांनी या चित्रपटावर खूप वाईट शेरे मारले. खलिद महम्मद, ज्यांनी खुर्च्यांना खिळवून ठेवणारे दोन चित्रपट ‘तहज़ीब’ आणि ‘फ़िज़ा’ बनवले (म्हणजे खुर्च्या थिएटरला खिळून राहिल्या, लोक मात्र बिचारे उठून गेले), त्यांनी चित्रपट न पाहताच त्यावर समीक्षा लिहिण्याचा विश्वविक्रम ही केला. या चित्रपटामुळे काही पत्रकार दुखावले जाणार याची आम्हाला पहिल्यापासून खात्री होती. राजीव मसंद यांनी सीएनएन-आयबीएन वर केलेल्या समीक्षेत म्हटलं की दिग्दर्शकाने सिनेमात स्टिंग ऑपरेशन चित्रित करून तोच गुन्हा केलाय्‍ जो स्टिंग ऑपरेशन करणारे पत्रकार करतात. हे म्हणजे एका चित्रपटात एका अभिनेत्रीने वेश्येचं काम केलं तर ती ही वेश्याच आहे, असं म्हटल्यासारखं झालं.

सामान्य लोकांना हा चित्रपट आवडला आहे, हे जाहिर आहे. Yahoo.com, sulekha.com, bharatstudent.com, या संकेतस्थळांवर ही चित्रपटाचे चांगले रिपोर्ट्स आले आहेत. माझ्या इंग्रजी ब्लॉगवर मी या चित्रपटाची गाणी आणि त्याच्या मागची कथा लिहिली आहे. आपण ही गाणी ऐकून प्रतिक्रिया कळवल्यास मला खूप आनंद होईल.

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/its-breaking-news-second-song.html

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/its-breaking-news-first-song.html

http://musicandnoise.blogspot.com/2007/10/it-breaking-news-trailers.html

एकविसाव्या शतकातील मराठी संगीतकार…

…आणि त्याच्यासमोर असणारी आव्हानं

अरूण म्हात्रेंच्या एका कवितेच्या ओळी अशा काही आहेत –

हे कुठले रस्ते आपण घडवित जातो

वळणावर कुठली वळणे दडवित जातो

जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी

हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो

एकविसाव्या शतकातल्या एका मराठी संगीतकाराच्या मनाची अवस्था साधारण अशीच आहे. सूर्य या नव्या दिशा सांगत असतानाच्या काळात एक मराठी संगीतकार असणं म्हणजे काय या विषयावर हे स्वैर चिंतन आहे असं म्हणायला हरकत नाही.

मी संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा सातत्याने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आपण चुकीच्या काळात संगीत क्षेत्रात आहोत की काय या विचाराने हळहळ वाटत रहायची. सुधीर फडके, गजाननराव वाटवे, वसंत देसाई, वसंत प्रभू, राम कदम, श्रीनिवास खळे, वसंत पवार, आणि त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर इत्यादी दिग्गजांचं संगीत ऐकुन ज्या चर्चा मित्रांमध्ये व्हायच्या त्या मध्ये या हळहळीला वाचा फुटायची. खंत वेगवेगळ्या प्रकारची होती. एकूण वातावरणात एक उदासीनता होती, फार कमी कवी गीत हा प्रकार हाताळत होते, मराठी संगीताचा बहुतांश श्रोतृवर्ग साठीच्या पुढचा होता कारण (किंवा म्हणून) मराठी संगीताच्या कार्यक्रमांतून जुनी गाणी (५०-६० या दशकातली) प्रामुख्याने ऐकू यायची, नवीन संगीत निर्मितीचं व्यासपीठ म्हणून रेडियोची अनुपलब्धता, नवीन संगीत करणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांची, आणि ते जिद्दीने आणि नियमितपणे बाजारात उपलब्ध करून देणाऱ्यांची उणीव, मराठी चित्रपटातून संगीताचं लयाला गेलेलं स्थान, अशा नानाविध समस्या मनाला ग्रासून टाकयच्या. पण हळूहळू मला या काळ्या ढगाला असलेली रूपेरी किनार दिसू लागली आणि या काळात संगीत दिग्दर्शक असणं – विशेषत: मराठी संगीत जगताचा एक घटक असण्याची मौज कळू लागली. मराठी संगीताचा फार चांगला काळ नसताना आपण त्याचा एक भाग असायला एक वेगळं भाग्य लागतं. मला ते भाग्य लाभलं या बद्दल संपूर्ण समाजव्यवस्थेचा मी अतिशय ऋणी आहे.

कुठल्याही कलेला प्रतिकूल वाटणारा काळ खरं तर त्या कलेच्या चांगल्या भविष्याचं बीज असतो, असा आशावादी दृष्टीकोन ठेवणं मराठी संगीतासाठी आणि संगीतकारांच्या morale साठी अपरिहार्य आहे. कारण परिस्थिती प्रतिकूल असतानाच ती अनुकूल करून घेण्यासाठी सजग असे प्रयत्न होतात. एका खऱ्या कलाकारासाठी हीच प्रतिकूल परीस्थिती एक आव्हान बनून समोर येते. मराठी संगीताच्या सुवर्णकाळात’ ज्या गोष्टी आपोआप होत असत, त्या आता जाणीवपूर्वक कराव्या लागणार असतात. या काळामध्ये निर्माण होणाऱ्या चांगल्या संगीताचं मोल हे सुवर्णकाळात निर्माण झालेल्या संगीतापेक्षा थोडं का होईना पण जास्त आहे असं मला निश्चित वाटतं.

एका नवीन संगीतकारासमोर येणारी आव्हानं –

खरं तर वरच्या शीर्षकामधला ‘नवीन’ हा शब्द काढला तरी चालण्यासारखं आहे, कारण यातली काही आव्हानं ही दहा वर्ष काम केल्यानंतर सुद्धा येतच राहतात. आणि क्षेत्रात दहा वर्ष काम करून सुद्धा काही संगीतकार ‘नवीन’ आणि ‘उदयोन्मुख’च राहतात – हे अनेक आव्हानांपैकी एक आहे. परंतु हे पहिलं आव्हान नव्हे.

‘मराठी संगीत’ या संज्ञेमध्येच ‘मराठी गीत’ ही संज्ञा दडलेली आहे. आणि इथेच पहिलं आव्हान आपलं डोकं वर करतं. डोकं वर करून पाहिलं तरी सहजासहजी दर्जेदार मराठी गीतकार सापडत नाही – (किंवा दर्जेदार गीतकारांना दर्जेदार संगीतकार सापडत नसावा!) आचार्य अत्रेंना १९२६ साली ‘कवी थोडे आणि कवडे फार’ असं वाटत होतं तर आज त्यांना काय वाटलं असतं याचा तर्क करावासाच वाटत नाही. पण त्यातून गीत हा काव्यप्रकार (lyric) समर्थपणे हाताळणारा कवी तर फारच विरळा. ज्या काही थोड्या लोकांमध्ये ही क्षमता आढळते त्यांचं त्या craft वर प्रभुत्व असतंच असं नाही. फार पूर्वी दूरदर्शनवर शांताबाई शेळकेंची एक मुलाखत माझ्या मनात घर करून राहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आपण ‘प्रतिभावंत’ हा शब्द (genius या अर्थी) फार सरसकटपणे आणि वरचेवर वापरतो. पण प्रतिभावान माणसं फारच कमी असतात – खूप लोकांना त्या त्या कलेचं नैसर्गिक असं अंग असतं (ज्याला त्यांनी talent असं म्हटलं होतं). आपण स्वतः सुद्धा या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतो हे आपलं मत त्यांनी अतिशय विनम्रतेने पण matter of fact पद्धतीने मांडलं होतं. त्या पुढे म्हणाल्या होत्या की जे लोक प्रतिभावान नाहीत पण ज्यांच्या अंगी असे नैसर्गिक गुण आहेत त्यांनी त्या कलेची craftsmanship आत्मसात करायला हवी. गीत लिहिण्यासाठी लागणारी संवेदनक्षमता जरी खूप लोकांमध्ये आढळली तरी कारागिरी सापडत नाही. छंद म्हणजे काय? वृत्त कसाशी खातात? कवितेचं मीटर चुकल्यामुळे तालामध्ये काय गडबड होऊ शकते – या मूलभूत गोष्टीही गीतकार होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना ठाऊक नसल्यामुळे गीतकार आणि संगीतकारामध्ये जो समन्वय साधला जायला हवा तो साधला जाऊ शकत नाही. (काही ‘गीतकार’ हे मीटर मध्ये न लिहिता ‘किलोमीटर’ मध्ये लिहीत असतात हे त्यांचं त्यांना ही ध्यानात येत नाही!) या सगळ्याचे थेट पडसाद त्या गीत-संगीत निर्मितीवर उमटतात.

हा झाला गीतकारांचा प्रश्न. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ज्या संगीतकारांना उत्तम गीत लिहून मिळतं त्यांना त्या गीतामधल्या भाषेचे काही तरल आणि सूक्ष्म भाव कळतात की नाही. ‘मराठी संगीत’ असं म्हटलं की संगीतकाराची आणि मराठीची मैत्री असावी ही अट अगदी रास्त आहे. ज्या संगीतकाराला गीतामधल्या सूक्ष्म जागा दिसू शकत नाहीत त्याची चाल अतिशय ढोबळ आणि प्राथमिक पातळीची होणार हे ओघाओघानं आलंच.

यावर एक उपाय म्हणजे जुन्या कविता शोधून त्यांना संगीतबद्ध करणं. ती सुद्धा एक गरज आहेच. कुठल्याही अभिजात कलाकृतीचे नवीन अन्वयार्थ नव्या पिढीने लावले तर त्या अभिजात कलाकृतीचे आयुष्य वाढते. पण फक्त एवढच करून आपलं संगीत किती प्रवाही राहू शकेल असा प्रश्न आहे. भावसंगीतामध्ये ‘प्रवाही असणं’ हा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, तर भावसंगीतही बदलण्याची गरज असते, नाहीतर हे संगीत अप्रस्तुत वाटू शकतं. मराठी संगीताच्या कार्यक्रमांना गर्दी ही ज्येष्ठ नागरिकांची असते आणि तरूण वर्ग विशेष उपस्थित नसतो त्याचं प्रमुख कारण हे असावं. ‘शुक्रतारा मंदवारा’ हे गीत किती ही अप्रतीम असलं तरी आजच्या तरूणाला प्रेम करण्यासाठी त्याच्या आयुष्याशी संबंध असलेल्या नवनवीन प्रेमगीतांची निर्मिती होणं केवळ अपरिहार्य आहे. एका वेगळ्या प्रकाराचं उदाहरण द्यायचं म्हणजे – केवळ, सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, किंवा कट्यार काळजात घुसली सादर करून संगीत रंगभूमी जिवंत राहणं कठीण आहे. त्यासाठी संगीत नाटकांच्या परंपरेतीलच, पण एक नवीन नाटक सादर होणंच गरजेचं आहे – ज्याला आजचे संदर्भ असतील.

यातुन आणखी एक प्रश्न निर्माण होतो म्हणजे ‘आजचं’ मराठी संगीत म्हणजे काय? बऱ्याचदा ‘आधुनिक’ आणि ‘पाश्चात्त्य’ यामध्ये गल्लत होण्याची शक्यता असते आणि तशी ती बऱ्याच २१व्या शतकातल्या संगीतकारांची होते देखिल. या निमित्ताने मराठी आधुनिकतेचा शोध घ्यायला हवा. पाश्चात्त्य न होता मराठी idiom मध्येच आधुनिक होता आलं तर मराठी संगीताला अनेक दालनं खुली होतील असा माझा विश्वास आहे.

एका ज्येष्ठ पत्रकाराने मला एकदा कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला होता. मराठी संगीताचं नेमकं मराठीपण कुठे असतं? काही मराठी संगीतकारांनी दिलेल्या हिंदी गीतांच्या चाली सुद्धा मराठीच वाटतात याकडे त्यांनी माझं लक्ष वेधलं. त्याचीच एक वेगळी बाजू अशी आहे की अलिकडच्या काही मराठी गीतांमध्ये हे मराठीपण अजिबातच आढळून येत नाही. किंवा काही हिंदी चित्रसृष्टीतल्या गायकांनी गायलेली मराठी गाणी हिंदीतूनच गायल्यासारखी वाटतात. यात अनेक वेगवेगळ्या बाबी एकाच वेळी गुंतलेल्या आहेत. गायकाची कहन, त्या प्रदेशाचा भूगोल, समाजव्यवस्थ्या, अशा अनेक गोष्टी आपापला प्रभाव त्या गाण्यावर पाडत असतात. पं. सत्यशील देशपांडे यांनी लोकसंगीतावर केलेल्या एका विवेचनात असं म्हटलं होतं की नेपाळच्या लोकधुना ह्या प्रामुख्याने तारसप्त्कातच वावरणाऱ्या असतात याला त्याचा भूगोल कारणीभूत आहे. उंच बर्फाचे कडे आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे माणूस सहजासहजी दुसऱ्या माणसाच्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे ‘आवाज’ ही एकच आश्वासक गोष्ट असते. ही लोकगीतं एक हाळी किंवा हाक दिल्याप्रमाणे तारसप्तकाच्या काही सुरांमध्ये फिरत राहतात. मराठी संगीताच्या बाबतीत एक सूत्र हाती लागतं – की सोप्यातल्या सोप्या चालींमध्ये सुद्धा एक प्रकारची complexity असते.

आपण २ उदाहरणं घेऊ या. शंकर-जयकिशन यांची एक चाल – ‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल, दुनिया बड़ी है संगदिल -’ आणि ह्या गाण्याबरोबर सुधीर फडके यांचं – ‘हा माझा मार्ग एकला -’ हे गीत घ्या. आता दुसरं उदाहरण अलिकडच्या काळातलं. ए. आर. रेहमान यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटातलं ‘ये तारा वो तारा’ हे गाणं घ्या आणि त्या बरोबर अजय-अतुल यांचं ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गीत घ्या. आपल्या लक्षात येईल की दोन्ही मराठी गाण्यांमधे, काळ बदलून सुद्धा त्या संपूर्ण रचनेत एक complexity आढळते जी वरील दोन्ही हिंदी गाण्यांत आढळत नाही. वरील चारही गाण्यांमधे गोडवा आहे आणि सगळीच गाणी दर्जेदार आहेत पण या दोन मराठी गाण्यांमधली complexity किंवा रचनेतली सूक्ष्मता हीच या गाण्यांच्या मराठीपणाचं एक परिमाण आहे. यात आपल्याला आढळेल की वेगवेगळ्या अंतऱ्यांना वेगवेगळ्या चाली करणं जितकं आपल्याला मराठी संगीतात सापडेल तितक्या सहजासहजी हिंदी गीतांमध्ये नाही सापडणार. हीच complexity बंगाली किंवा कन्नड गीतांमध्ये एका वेगळ्या रूपात आपल्याला ती भेटू शकते. पण मराठी संगीतकारांचा पिंड हा रचनेच्या बाबतीत अधिक सूक्ष्मतेकडे धाव घेणारा आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं एक कारण मला असं वाटतं की मराठी मन हे academic आहे. एका संगीतकाराबरोबर त्याच्या मनातला एक समीक्षकही समांतरपणे त्या निर्मितीप्रक्रियेत सहभागी असतो.

आज मराठी संगीतकार असणं यात फक्त छान गाणी निर्माण होत आहेत का नाहीत आणि ती लोकांपर्यंत पोचत आहेत की नाहीत या पलिकडेही जाऊन काही इतर गंभीर मुद्दे आहेत. मराठी आणि संगीत, असं दोन्ही आपल्या संगीतातून दिसतंय्‍ की नाही याकडे मराठी संगीतकारांचं लक्ष असायला हवं. भाषेचा अभ्यास नसला तरी किमान भाषेबद्दल आस्था असणं गरजेचं आहे.

मला व्य्कतिश: आजचं चित्र खूपच आशावादी दिसतं. माझ्या बरोबर अनेक समकालीन मराठी संगीतकार आपली वाट शोधायचा एक प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या परंपरेचं भान ठेवून प्रयोग करायला बिचकत नाहीयेत्‌. बऱ्याच संगीतकारांना त्यांच्या प्रयोगांमधे यश देखिल मिळू लागलं आहे. संगीतकारांना नवनिर्मितीची ऊर्मी येण्याइतपत आजचं वातावरण अनुकूल होऊ लागलय्‌ (अगदी नवीन संगीतकारांच्या भाषेत नुसतं ‘कूल’ होऊ लगलंय्‌!!) मराठी चित्रसृष्टी सुद्धा आपल्या कक्षा रुंदावण्याच्या तयारीत आहे. मराठी संगीतामध्ये नवी ऊर्जा यायची असेल तर ती मराठी साहित्य, चित्रपट, नाटक, यातही झिरपण्याची गरज आहे. अजून बरेच मुद्दे आहेत जे माझ्यामदला समीक्षक मांडू पाहतोय, पण तूर्तास एक नवीन चाल सुचतेय्‌, त्याचं काय होतंय्‍ ते पाहतो!

© कौशल श्री. इनामदार, २००७.


टीप: वरील लेख ग्रंथालीच्या ‘रुची‘ या मासिकाच्या ‘बृहन्महाराष्ट्र सिऍटल अधिवेशन विशेषांक – जुलै २००७‘ मध्ये छापून आला होता.

Published in:  on ऑगस्ट 22, 2007 at 8:24 pm प्रतिक्रिया (12)