…आणि त्याच्यासमोर असणारी आव्हानं
अरूण म्हात्रेंच्या एका कवितेच्या ओळी अशा काही आहेत –
हे कुठले रस्ते आपण घडवित जातो
वळणावर कुठली वळणे दडवित जातो
जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी
हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो
एकविसाव्या शतकातल्या एका मराठी संगीतकाराच्या मनाची अवस्था साधारण अशीच आहे. सूर्य या नव्या दिशा सांगत असतानाच्या काळात एक मराठी संगीतकार असणं म्हणजे काय या विषयावर हे स्वैर चिंतन आहे असं म्हणायला हरकत नाही.
मी संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा सातत्याने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना आपण चुकीच्या काळात संगीत क्षेत्रात आहोत की काय या विचाराने हळहळ वाटत रहायची. सुधीर फडके, गजाननराव वाटवे, वसंत देसाई, वसंत प्रभू, राम कदम, श्रीनिवास खळे, वसंत पवार, आणि त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर इत्यादी दिग्गजांचं संगीत ऐकुन ज्या चर्चा मित्रांमध्ये व्हायच्या त्या मध्ये या हळहळीला वाचा फुटायची. खंत वेगवेगळ्या प्रकारची होती. एकूण वातावरणात एक उदासीनता होती, फार कमी कवी गीत हा प्रकार हाताळत होते, मराठी संगीताचा बहुतांश श्रोतृवर्ग साठीच्या पुढचा होता कारण (किंवा म्हणून) मराठी संगीताच्या कार्यक्रमांतून जुनी गाणी (५०-६० या दशकातली) प्रामुख्याने ऐकू यायची, नवीन संगीत निर्मितीचं व्यासपीठ म्हणून रेडियोची अनुपलब्धता, नवीन संगीत करणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांची, आणि ते जिद्दीने आणि नियमितपणे बाजारात उपलब्ध करून देणाऱ्यांची उणीव, मराठी चित्रपटातून संगीताचं लयाला गेलेलं स्थान, अशा नानाविध समस्या मनाला ग्रासून टाकयच्या. पण हळूहळू मला या काळ्या ढगाला असलेली रूपेरी किनार दिसू लागली आणि या काळात संगीत दिग्दर्शक असणं – विशेषत: मराठी संगीत जगताचा एक घटक असण्याची मौज कळू लागली. मराठी संगीताचा फार चांगला काळ नसताना आपण त्याचा एक भाग असायला एक वेगळं भाग्य लागतं. मला ते भाग्य लाभलं या बद्दल संपूर्ण समाजव्यवस्थेचा मी अतिशय ऋणी आहे.
कुठल्याही कलेला प्रतिकूल वाटणारा काळ खरं तर त्या कलेच्या चांगल्या भविष्याचं बीज असतो, असा आशावादी दृष्टीकोन ठेवणं मराठी संगीतासाठी आणि संगीतकारांच्या morale साठी अपरिहार्य आहे. कारण परिस्थिती प्रतिकूल असतानाच ती अनुकूल करून घेण्यासाठी सजग असे प्रयत्न होतात. एका खऱ्या कलाकारासाठी हीच प्रतिकूल परीस्थिती एक आव्हान बनून समोर येते. मराठी संगीताच्या “सुवर्णकाळात’ ज्या गोष्टी आपोआप होत असत, त्या आता जाणीवपूर्वक कराव्या लागणार असतात. या काळामध्ये निर्माण होणाऱ्या चांगल्या संगीताचं मोल हे सुवर्णकाळात निर्माण झालेल्या संगीतापेक्षा थोडं का होईना पण जास्त आहे असं मला निश्चित वाटतं.
एका नवीन संगीतकारासमोर येणारी आव्हानं –
खरं तर वरच्या शीर्षकामधला ‘नवीन’ हा शब्द काढला तरी चालण्यासारखं आहे, कारण यातली काही आव्हानं ही दहा वर्ष काम केल्यानंतर सुद्धा येतच राहतात. आणि क्षेत्रात दहा वर्ष काम करून सुद्धा काही संगीतकार ‘नवीन’ आणि ‘उदयोन्मुख’च राहतात – हे अनेक आव्हानांपैकी एक आहे. परंतु हे पहिलं आव्हान नव्हे.
‘मराठी संगीत’ या संज्ञेमध्येच ‘मराठी गीत’ ही संज्ञा दडलेली आहे. आणि इथेच पहिलं आव्हान आपलं डोकं वर करतं. डोकं वर करून पाहिलं तरी सहजासहजी दर्जेदार मराठी गीतकार सापडत नाही – (किंवा दर्जेदार गीतकारांना दर्जेदार संगीतकार सापडत नसावा!) आचार्य अत्रेंना १९२६ साली ‘कवी थोडे आणि कवडे फार’ असं वाटत होतं तर आज त्यांना काय वाटलं असतं याचा तर्क करावासाच वाटत नाही. पण त्यातून गीत हा काव्यप्रकार (lyric) समर्थपणे हाताळणारा कवी तर फारच विरळा. ज्या काही थोड्या लोकांमध्ये ही क्षमता आढळते त्यांचं त्या craft वर प्रभुत्व असतंच असं नाही. फार पूर्वी दूरदर्शनवर शांताबाई शेळकेंची एक मुलाखत माझ्या मनात घर करून राहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आपण ‘प्रतिभावंत’ हा शब्द (genius या अर्थी) फार सरसकटपणे आणि वरचेवर वापरतो. पण प्रतिभावान माणसं फारच कमी असतात – खूप लोकांना त्या त्या कलेचं नैसर्गिक असं अंग असतं (ज्याला त्यांनी talent असं म्हटलं होतं). आपण स्वतः सुद्धा या दुसऱ्या प्रकारामध्ये मोडतो हे आपलं मत त्यांनी अतिशय विनम्रतेने पण matter of fact पद्धतीने मांडलं होतं. त्या पुढे म्हणाल्या होत्या की जे लोक प्रतिभावान नाहीत पण ज्यांच्या अंगी असे नैसर्गिक गुण आहेत त्यांनी त्या कलेची craftsmanship आत्मसात करायला हवी. गीत लिहिण्यासाठी लागणारी संवेदनक्षमता जरी खूप लोकांमध्ये आढळली तरी कारागिरी सापडत नाही. छंद म्हणजे काय? वृत्त कसाशी खातात? कवितेचं मीटर चुकल्यामुळे तालामध्ये काय गडबड होऊ शकते – या मूलभूत गोष्टीही गीतकार होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना ठाऊक नसल्यामुळे गीतकार आणि संगीतकारामध्ये जो समन्वय साधला जायला हवा तो साधला जाऊ शकत नाही. (काही ‘गीतकार’ हे मीटर मध्ये न लिहिता ‘किलोमीटर’ मध्ये लिहीत असतात हे त्यांचं त्यांना ही ध्यानात येत नाही!) या सगळ्याचे थेट पडसाद त्या गीत-संगीत निर्मितीवर उमटतात.
हा झाला गीतकारांचा प्रश्न. या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ज्या संगीतकारांना उत्तम गीत लिहून मिळतं त्यांना त्या गीतामधल्या भाषेचे काही तरल आणि सूक्ष्म भाव कळतात की नाही. ‘मराठी संगीत’ असं म्हटलं की संगीतकाराची आणि मराठीची मैत्री असावी ही अट अगदी रास्त आहे. ज्या संगीतकाराला गीतामधल्या सूक्ष्म जागा दिसू शकत नाहीत त्याची चाल अतिशय ढोबळ आणि प्राथमिक पातळीची होणार हे ओघाओघानं आलंच.
यावर एक उपाय म्हणजे जुन्या कविता शोधून त्यांना संगीतबद्ध करणं. ती सुद्धा एक गरज आहेच. कुठल्याही अभिजात कलाकृतीचे नवीन अन्वयार्थ नव्या पिढीने लावले तर त्या अभिजात कलाकृतीचे आयुष्य वाढते. पण फक्त एवढच करून आपलं संगीत किती प्रवाही राहू शकेल असा प्रश्न आहे. भावसंगीतामध्ये ‘प्रवाही असणं’ हा त्याचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, तर भावसंगीतही बदलण्याची गरज असते, नाहीतर हे संगीत अप्रस्तुत वाटू शकतं. मराठी संगीताच्या कार्यक्रमांना गर्दी ही ज्येष्ठ नागरिकांची असते आणि तरूण वर्ग विशेष उपस्थित नसतो त्याचं प्रमुख कारण हे असावं. ‘शुक्रतारा मंदवारा’ हे गीत किती ही अप्रतीम असलं तरी आजच्या तरूणाला प्रेम करण्यासाठी त्याच्या आयुष्याशी संबंध असलेल्या नवनवीन प्रेमगीतांची निर्मिती होणं केवळ अपरिहार्य आहे. एका वेगळ्या प्रकाराचं उदाहरण द्यायचं म्हणजे – केवळ, सौभद्र, मानापमान, संशयकल्लोळ, किंवा कट्यार काळजात घुसली सादर करून संगीत रंगभूमी जिवंत राहणं कठीण आहे. त्यासाठी संगीत नाटकांच्या परंपरेतीलच, पण एक नवीन नाटक सादर होणंच गरजेचं आहे – ज्याला आजचे संदर्भ असतील.
यातुन आणखी एक प्रश्न निर्माण होतो म्हणजे ‘आजचं’ मराठी संगीत म्हणजे काय? बऱ्याचदा ‘आधुनिक’ आणि ‘पाश्चात्त्य’ यामध्ये गल्लत होण्याची शक्यता असते आणि तशी ती बऱ्याच २१व्या शतकातल्या संगीतकारांची होते देखिल. या निमित्ताने मराठी आधुनिकतेचा शोध घ्यायला हवा. पाश्चात्त्य न होता मराठी idiom मध्येच आधुनिक होता आलं तर मराठी संगीताला अनेक दालनं खुली होतील असा माझा विश्वास आहे.
एका ज्येष्ठ पत्रकाराने मला एकदा कोड्यात टाकणारा प्रश्न विचारला होता. मराठी संगीताचं नेमकं मराठीपण कुठे असतं? काही मराठी संगीतकारांनी दिलेल्या हिंदी गीतांच्या चाली सुद्धा मराठीच वाटतात याकडे त्यांनी माझं लक्ष वेधलं. त्याचीच एक वेगळी बाजू अशी आहे की अलिकडच्या काही मराठी गीतांमध्ये हे मराठीपण अजिबातच आढळून येत नाही. किंवा काही हिंदी चित्रसृष्टीतल्या गायकांनी गायलेली मराठी गाणी हिंदीतूनच गायल्यासारखी वाटतात. यात अनेक वेगवेगळ्या बाबी एकाच वेळी गुंतलेल्या आहेत. गायकाची कहन, त्या प्रदेशाचा भूगोल, समाजव्यवस्थ्या, अशा अनेक गोष्टी आपापला प्रभाव त्या गाण्यावर पाडत असतात. पं. सत्यशील देशपांडे यांनी लोकसंगीतावर केलेल्या एका विवेचनात असं म्हटलं होतं की नेपाळच्या लोकधुना ह्या प्रामुख्याने तारसप्त्कातच वावरणाऱ्या असतात याला त्याचा भूगोल कारणीभूत आहे. उंच बर्फाचे कडे आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे माणूस सहजासहजी दुसऱ्या माणसाच्या दृष्टीस पडत नाही. त्यामुळे ‘आवाज’ ही एकच आश्वासक गोष्ट असते. ही लोकगीतं एक हाळी किंवा हाक दिल्याप्रमाणे तारसप्तकाच्या काही सुरांमध्ये फिरत राहतात. मराठी संगीताच्या बाबतीत एक सूत्र हाती लागतं – की सोप्यातल्या सोप्या चालींमध्ये सुद्धा एक प्रकारची complexity असते.
आपण २ उदाहरणं घेऊ या. शंकर-जयकिशन यांची एक चाल – ‘जाऊँ कहाँ बता ऐ दिल, दुनिया बड़ी है संगदिल -’ आणि ह्या गाण्याबरोबर सुधीर फडके यांचं – ‘हा माझा मार्ग एकला -’ हे गीत घ्या. आता दुसरं उदाहरण अलिकडच्या काळातलं. ए. आर. रेहमान यांच्या ‘स्वदेस’ चित्रपटातलं ‘ये तारा वो तारा’ हे गाणं घ्या आणि त्या बरोबर अजय-अतुल यांचं ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गीत घ्या. आपल्या लक्षात येईल की दोन्ही मराठी गाण्यांमधे, काळ बदलून सुद्धा त्या संपूर्ण रचनेत एक complexity आढळते जी वरील दोन्ही हिंदी गाण्यांत आढळत नाही. वरील चारही गाण्यांमधे गोडवा आहे आणि सगळीच गाणी दर्जेदार आहेत पण या दोन मराठी गाण्यांमधली complexity किंवा रचनेतली सूक्ष्मता हीच या गाण्यांच्या मराठीपणाचं एक परिमाण आहे. यात आपल्याला आढळेल की वेगवेगळ्या अंतऱ्यांना वेगवेगळ्या चाली करणं जितकं आपल्याला मराठी संगीतात सापडेल तितक्या सहजासहजी हिंदी गीतांमध्ये नाही सापडणार. हीच complexity बंगाली किंवा कन्नड गीतांमध्ये एका वेगळ्या रूपात आपल्याला ती भेटू शकते. पण मराठी संगीतकारांचा पिंड हा रचनेच्या बाबतीत अधिक सूक्ष्मतेकडे धाव घेणारा आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. याचं एक कारण मला असं वाटतं की मराठी मन हे academic आहे. एका संगीतकाराबरोबर त्याच्या मनातला एक समीक्षकही समांतरपणे त्या निर्मितीप्रक्रियेत सहभागी असतो.
आज मराठी संगीतकार असणं यात फक्त छान गाणी निर्माण होत आहेत का नाहीत आणि ती लोकांपर्यंत पोचत आहेत की नाहीत या पलिकडेही जाऊन काही इतर गंभीर मुद्दे आहेत. मराठी आणि संगीत, असं दोन्ही आपल्या संगीतातून दिसतंय् की नाही याकडे मराठी संगीतकारांचं लक्ष असायला हवं. भाषेचा अभ्यास नसला तरी किमान भाषेबद्दल आस्था असणं गरजेचं आहे.
मला व्य्कतिश: आजचं चित्र खूपच आशावादी दिसतं. माझ्या बरोबर अनेक समकालीन मराठी संगीतकार आपली वाट शोधायचा एक प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या परंपरेचं भान ठेवून प्रयोग करायला बिचकत नाहीयेत्. बऱ्याच संगीतकारांना त्यांच्या प्रयोगांमधे यश देखिल मिळू लागलं आहे. संगीतकारांना नवनिर्मितीची ऊर्मी येण्याइतपत आजचं वातावरण अनुकूल होऊ लागलय् (अगदी नवीन संगीतकारांच्या भाषेत नुसतं ‘कूल’ होऊ लगलंय्!!) मराठी चित्रसृष्टी सुद्धा आपल्या कक्षा रुंदावण्याच्या तयारीत आहे. मराठी संगीतामध्ये नवी ऊर्जा यायची असेल तर ती मराठी साहित्य, चित्रपट, नाटक, यातही झिरपण्याची गरज आहे. अजून बरेच मुद्दे आहेत जे माझ्यामदला समीक्षक मांडू पाहतोय, पण तूर्तास एक नवीन चाल सुचतेय्, त्याचं काय होतंय् ते पाहतो!
© कौशल श्री. इनामदार, २००७.
टीप: वरील लेख ग्रंथालीच्या ‘रुची‘ या मासिकाच्या ‘बृहन्महाराष्ट्र सिऍटल अधिवेशन विशेषांक – जुलै २००७‘ मध्ये छापून आला होता.
Hi Kaushal,
I appreciate ur efforts. Actually i also would have liked to give my opinion in my beloved mothertounge; but as i don’t have that facility on my computer, i m helpless.. anyways,
What u say is very true. To appreciate Marathi sangeet, one should know the language thourougly. N i feel this is the main area we r lagging behind. New generation is growing with the advanced technology n its the need of the hour that we need to widen our horizons. Most of the kids go to English medium schools nowadays… agreed, no problems with that. But then it becomes their parents’ responsibility to make them aware of their own culture first n then go ahead.. Many of my friends do not understand the meaning of the words in Marathi songs. They just enjoy the tune. Thats it.
U have very well quoted the examples… The minute details that u talk about r really good.
hi kaushal,
interesting blog.
tumchya A.R.Rehman varil lekhanantar ha lekh vachayla far chhan vaTla!
pravahipNa cha mudda tar atishay ch relevant ahe.
pN tya 4 gaNyavishyi ajun thoDe elaborate kral ka?
Comment by vandana khare — ऑगस्ट 24, 2007 @
वा! आपला लेख उत्तमच आहे, याबाबत काही शंका नाही. मी तो एकदा वाचला, आणि पुनः एकदा मला तो वाचावा लागला. पहिल्यांदा एक लेख म्हणून आणि दुसऱ्यांदा डोक्यात वैचारिक प्रक्रीया सुरू झाल्यामुळे…!
मला एक संकल्पना जरा कळली नाहीये. ’मराठी संगीतकार’ ह्या शब्दप्रयोजनाने आपल्याला नेमके काय सूचित करावयाचे आहे / अभिप्रेत आहे, ते थोडक्यात स्पष्ट कराल का? ’मराठी माणूस’ ह्या संकल्पनेचा विस्तार म्हणजे हा शब्दप्रयोग असू शकेल काय? एखाद्या संगीतकाराची मातृभाषा मराठी आहे म्हणून आपण त्याला ’मराठी संगीतकार’ म्हणू का?
मी आजपर्यंत कधीही इतर भाषिक संगीतकारांना स्वतःस अमुक भाषिक संगीतकार असे म्हणवून घेताना पाहिले अथवा ऐकले नाही. आपणही कधी कुणा संगीतकारास त्यच्या भाषेवरुन संबोधित नाही. पंचमदा बंगाली संगीतकार नव्हते. इळैयराजा किंवा रहमान तमिळ संगीतकार आहेत असे कोणी कधी म्हणत नाही. ओ. पी. नय्यरजींनी कायम पंजाबी ठेकेच वाजवले तरी त्यांनादेखील कोणी पंजाबी संगीतकार म्हटल्याचे स्मरत नाही. हिमेश रेशम्मिया आणि इस्माईल दरबार गुजराती संगीतकार नाहीत.. पण..
संगीतक्षेत्रात सध्या हा नवीन शब्दप्रयोग रूढ होऊ पाहत आहे. आणि हे केवळ मराठीजनांबाबतच होतंय. एक अगदीच क्षुल्लक रसिक असलो तरी मला हे काहीसे अनाकलनीयच वाटते. कदाचित मी अर्थ लावण्यात चुकत असेन.. पण मला असे वाटते, की ’मराठी माणूस’ संगीतकार झाला, की लोक त्याला
’मराठी संगीतकार’ असे म्हणतात. ’लोकसत्ते’च्या श्री. मुकुंद संगोराम ह्यांच्याशी चर्चा करताना मागे एकदा मी ह्याबाबतीत विचारले होते (त्यांचे वडिलसुद्धा संगीतकार होते) पण त्यांच्या उत्तराने माझे समाधान झालेले नाही.
प्रश्न तसा थोडक्यात टोलावता येण्यासारखा आहे, बहुदा माझा वैचारिक गोंधळ का काय म्हणतात तो उडाला असावा; पण आपल्या उत्तराने तो दुर व्हावा असे अपेक्षितो.
असो, मराठीत ब्लॊग सुरु केल्याबद्दल अभिनंदन. संगीतक्षेत्रातही, विशेषतः संगीतनिर्मितीतदेखील अनेक गोष्टी अंतर्भूत असाव्यात. त्या रसिकांना नेहमीच कळतील असे नाही. पण आपल्यासारख्या संगीतकारांनी मनावर घेतल्यास रसिकजन संगीतातील माधुर्य समजावून घेऊ शकतील.
धन्यवाद!
अमित चंद्रन.
marathi sangeetkar hi sankalpana atyant chukichi aahe. bahutansh marathi manse hi geetanchi chahti asatat sangeetachi nawhe. pratyek lalit kale kade sahityachya chshmyatun baghnyachi atyant ghanerdi aani arthatach chukichi saway marathi lokanni lawun ghetli aahe. tyacha parinam mhanun aaj ghadila marathi manus sangeetacha aaswad gheuch shakat nahi. swar he shabdapeksha kiti tari patine shreshth aahet ,pan tathaakathit marathi rasik sangrrt suddha sahityachya daawnila bandhun duyyam tharwu pahato aahe. shabd wihin sangeetachi godi chakhnyasathi tyache vyakaran mahit asane aawashyak nahi. waachta yete mhanun waachanalach shreshth mananyachi ek ghanerdi paddhat lihinaryani suru keli aahe. sahitya aani sangeet hya bhinn baabi aahet tyachi dhedgujari sarmisal karne chuk aahe.
priya mangesh,
aapan “atyant chukichi sankalpana” he vaktavya kuthalya aadharavar karata he umgat naahi. Je gun tumhi marathi maanasaanshi jodata te gun pratyek bhaashechya lokanmadhe aadhalataat… aani shabdapradhaan sangeet he kuthalyahi sanskrutit sapadatach. “sahitya aani sangeet hya bhinn baabi aahet tyachi dhedgujari sarmisal karne chuk aahe.” Tumhi ji saral saral chuk-aani barobarchi vidhaana thokun detaay yaala kaahich abhyaspoorna aadhaar nahi he khedaane mhanavese vaatate. Mhanaje Mehdi Hassan, Ghulam Aline hi Urdu ghazal gaaylach nako ka?!!! Marathi maanus sangeetacha aaswad gheu shakat nahi ya saarakha vinodi vidhaan mi aajparyant aikal navhat. Tumcha mhanan zara abhyaspoorna asat tari yaala uttar denyaat kaahi arth hota. Atta mi phakta aaplyala shubhecchha deu shakato.
चाली तर कराच.. पण हे संगीतातलं ’मराठीपण’, ’कॉम्प्लेक्सिटी’, गाण्याच्या आपल्या आवडीतून दिसणारा आपला ’ऍकेडमिक’पणा… या सगळ्यावर कोण लिहील?! हे सगळं जाम इंटरेस्टिंग आणि युनिक आहे. लिहीत राहा…. लवकर लवकर लिहीत राहा.
प्रिय मित्र अमित,
लेख वाचून इतकं सविस्तर त्याविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद.
माझी मराठी संगीतकाराची संकल्पना मांडायच्या आधी तुम्ही केलेल्या काही विधानांबद्दल स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे वाटते. आपण लिहिले होते –
मी आजपर्यंत कधीही इतर भाषिक संगीतकारांना स्वतःस अमुक भाषिक संगीतकार असे म्हणवून घेताना पाहिले अथवा ऐकले नाही. आपणही कधी कुणा संगीतकारास त्यच्या भाषेवरुन संबोधित नाही. पंचमदा बंगाली संगीतकार नव्हते. इळैयराजा किंवा रहमान तमिळ संगीतकार आहेत असे कोणी कधी म्हणत नाही. ओ. पी. नय्यरजींनी कायम पंजाबी ठेकेच वाजवले तरी त्यांनादेखील कोणी पंजाबी संगीतकार म्हटल्याचे स्मरत नाही. हिमेश रेशम्मिया आणि इस्माईल दरबार गुजराती संगीतकार नाहीत.. पण.
सुगम संगीत किंवा सिने संगीत यांचा भाषेशी अतूट संबंध आहे. प्रत्येक संगीतकार एका ठराविक भाषेच्या संस्कारात वाढलेला असतो. त्या भाषेचे पडसाद त्याच्या संगीतावर उमटणे स्वाभाविक आहे. इळैराजाच्या आणि रेहमानच्या चालीं मध्ये सुद्धा त्यांच्या मातृभाषेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. ओ. पी. नय्यरांच्या पंजाबी ठेक्याचा उल्लेख तुम्ही केला आहेच. रवि किंवा पंकज मलिक यांचा सुद्धा पंजाबी लहजा त्यांच्या गाण्यातून साफ दिसतो. पंचम, एस्. डी., आणि सलीलदा (‘दा’ म्हणण्याची पद्धत ही बंगालीच! लक्ष्मीकांतदा किंवा प्यारेलालदा असं म्हणत नाही कोणी हे तुमच्या लक्षात आलंच असेल. हे indirectly प्रादेशिक संबोधनच आहे.) यांच्या संगीतामध्ये बाउल किंवा रवींद्र संगीताचे ठसे अगदी स्पष्ट आढळतात. विषेशत: ज्यांनी आपल्या मातृभाषेत विपुल संगीत दिलंय आणि ज्यांचा आपल्या सांगितिक मुळांशी संबंध टिकून असतो, त्यांचे प्रादेशिक संस्कार त्यांच्या गाण्यात झळकतातच. हे निकष लावले की आपोआप इस्माईल दरबार आणि हिमेश त्यातून बाद होतात. त्यांनी त्यांच्या भाषेत तसं फारसं काम केलं नाहीये.
तुमचं म्हणणं आहे की मराठी माणूस संगीतकार झाला की लोक त्याला मराठी संगीतकार म्हणतात. माझं बिल्कुल तसं म्हणणं नाही हे मी नमूद करतो. उदाहरण द्यायचं झालं तर सुधीर फडके हे मराठी संगीतकार आहेत पण लक्ष्मीकांत हे काही मराठी संगीतकार नव्हे. त्याच निकषाने सी. रामचंद्र आणि एन्. दत्ता हे प्रामुख्याने हिंदी भाषेच्या संस्कारात संगीतकार म्हणून वाढले. वेगळ्या क्षेत्रातलं उदाहरण द्यायचं तर विजय तेंडुलकर हे मराठी नाटककार आहेत पण मकरंद देशपांडें बद्दल हेच म्हणता येणार नाही. एक अगदी स्पष्ट सांगू इच्छितो की माझ्या कुठल्याही वाक्यात प्रादेशिक snobbery नाहिये. शब्दप्रधान संगीताच्या बाबतीत भाषा हा अविभाज्य घटक आहे आणि माझ्या लेखातील संदर्भ हे प्रादेशिक नसून भाषिक आहेत.
मी मराठी संगीतकार असा शब्दप्रयोग करतो तो खास मराठी गाण्यांना संगीत देण्याच्या बाबतीत करतो. चाल ही शब्दांना लागत असते. शब्द ठराविक भाषेत असतात. माझा मुद्दा हा आहे की ज्या भाषेत चाल द्यायची त्या भाषेतले काही सूक्ष्म संदर्भ, त्या भाषेचे उच्चार, हे आपोआप त्या रचनेत उतरतात. माझ्या दुसऱ्या ब्लॉगवर रेहमानच्या लेखामध्ये ही हा मुद्दा मी स्पष्ट केला आहे. एका भाषेतले संस्कार दुसऱ्या भाषेत रचना करताना सुद्धा प्रतिबिंबित होतात. हिंदी मध्ये वेगवेगळ्या भाषेतल्या संगीतकारांनी काम केल्यामुळे हिंदी गाण्याला एक प्रकारचं वैविद्ध्य आलंय आणि परिणामी त्याचं सौंदर्य वाढलंय असं माझं मत आहे.
आपण कधी कुणा संगीतकारास भाषेवरून संबोधत नाही हे विधान तितकंसं बरोबर नाही. आर. डी. बरमन, एस्. डी. बरमन, सलील चौधरी यांना बंगाली संगीतकार म्हटल्याचे अनेक दाखले आहेत. आत्ताच मी काही दिवसांपूर्वी बंगाली संगीतकारांच्या गाण्यांवर आधारित एका कार्यक्रमाची जाहिरात ही पाहिली.
शेवटी इतकंच सांगावसं वाटतं की संगीतकाराची भाषा कुठली ही असो, त्याची ‘भाषा’ या संकल्पनेशी मैत्री हवी. प्रत्येक भाषेची सौंदर्यस्थळं ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दडलेली आहेत. शब्दप्रधान संगीताचा अभ्यास करताना या भाषांबद्दल विचार मांडणं अपरिहार्य आहे. भारतात इतक्या भाषा आणि त्यांचे इतके dialects आहेत आणि ह्यांनी आपलं सांस्कृतिक जीवन अधिक श्रीमंत केलं आहे.
तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलाय्. तरी या व्यतिरिक्त तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर त्यांचा खुलासा प्रात्यक्षिकाने अधिक चांगल्या तऱ्हेने करून देता येईल असा माझा विश्वास आहे.
पुन्हा एकदा आपण या प्रश्नामध्ये रस घेतल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
http://kaushalsinamdar.com
http://musicandnoise.blogspot.com
http://ksinamdar.wordpress.com
kaushal,
good to see a marathi blog. We need more Marathi on net. Keep posted, best of luck
Vaibhav.
Dear Kaushal,
Your analysis is really good. But what i feel is you have written from the Music composers point of view, what general peopl wnat? is a million dollar question.
Even after so many years,pwople llisten to Maranthi Natya sangeet, and Geet rmamyan?
What are the things keeping GLued to those “songs?
GOod Music? or the presentaion?
We do not want to listen to the music of the Dada Kondke Cader. We even enjoy the recent music of Marathi Films like ÄAI SHAPPATH”
The musicians must first believe that the “Taste” for the good music is still there and there is lot of “Queste”for the good music .
प्रिय मित्र कौशलजी,
माझे शंकानिरसन करण्यासाठी आपण केवढे सविस्तर लिहिलेय..! खरेच धन्यवाद!
फ्क्त एक गोष्ट पहिल्यांदाच जरा स्पष्ट करू इच्छितो. ‘मराठी माणूस संगीतकार झाला की लोक त्याला मराठी संगीतकार म्हणतात’ असे माझे स्वतःचे अजिबात म्हणणे नाहीये, मला तसे वाटते असे मी लिहिले आहे. आणि हे वाटणे माझ्या निरिक्षणामुळे – माझे काही इतरभाषिक संगीतकार, संगीतप्रेमी, आणि पत्रकार मित्र ‘मराठी माणूस आणि त्याचे संगीत’ ह्या विषयावर नेहमी चर्चा करतात, त्यातून आले आहे हेही मी इथे नमूद करू इच्छितो.
असो. दक्षिणेच्या चारही प्रांतातील किती संगीतकार आपण ऐकलेत, मला खरेच कल्पना नाही. पण आपण येथे जे नमूद केलेय, ते दक्षिणेत आजसुद्धा मुख्यत्त्वाने पहावयास मिळते. भाषासौंदर्य, भाषेतले सूक्ष्म संदर्भ, भाषेचे उच्चार, काव्यातले गण, मात्रा इत्यादिंविषयी ह्या आधुनिक काळातही तेथे (जसा व्हायला पाहिजे तसा) फार सखोल विचार होतो – अगदी सिनेसंगीतातसुद्धा!
मुळात मराठीत नव्याने आलेला ‘मुक्तछंद’ नामक काव्यप्रकार दक्षिणेत सरसकट आलेला नाही, आणि स्वभाषेविषयीची प्रचंड जागृती दक्षिणेत मुळातच असल्यामुळे तेथील संगीतकारांचे ‘भाषाविषयक धोरण’ आपल्यापेक्षा वेगळे असावे. असो. आपल्या दीर्घ उत्तराने एक बहुभाषिक रसिक म्हणून मला खूपच आनंद झालाय. मराठीतदेखील भाषेविषयी जागृती झाल्यास मराठी संगीतास पुनः सोन्यासारखे दिवस येतील असे मला व्यक्तिशः वाटते.
‘मराठी संगीतकार’ असा शब्दप्रयोग आपण करता, तो खास मराठी गाण्यांना संगीत देण्याच्या बाबतीत असे आपण सांगितलेत. काव्यप्रधान / शब्दप्रधान संगीतरचना करताना किंवा काव्यावर आधारित रचना करताना हे विधान पटण्याजोगे आहे, शंकाच नाही. पण आजच्या instant काळात जेव्हां चाली आधी रचल्या जातात आणि शब्द मागाहून पेरले जातात, असे असताना ‘मराठी संगीतकार’ ह्या संकल्पनेची व्याप्ती आपल्यामते केवढी आणि किती असावी? असा एक नवा प्रश्न आता मला पडलाय.. तरी जेव्हां आणि जसा आपल्याला वेळ होईल तेंव्हा आपल्या शैलीमध्ये ह्यावर आपण विश्लेषण करावे ही विनंती.
पुन्हा एकदा आपण या प्रश्नामध्ये रस घेऊन एवढे सविस्तर उत्तर दिल्याबद्दल मन:पूर्वक आभार.
अमित चंद्रन
प्रिय कौशलजी
आपल्याला झी टिव्ही वर पाहिलं, बोलताना, गाताना ऐकलं तेव्हाच वातलं होतं की हा माणूस वेगळा आहे. आता आपल्याला वाचताना , मला वाटतं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय! आपल्या लिखाणातून एक स्वतंत्र वैचारिक बैठक अत्यंत प्रकर्षाने जाणवते.
मराठी कवींमध्ये आता पुर्वीइतके दर्जेदार गीतकार दिसत नाहीत हे सत्य कटू असले तरी ते सत्य आहेच. एक चांगले गीत स्वत:चे संगीत स्वत:सोबतच जन्माला घेऊन येते असे मला वाटते. ग्रेस ह्यांच्या किंवा भटांच्या किंवा शांताबाईंच्या गीतांमध्ये हे असे संगीत आहेच.
आपण असेच पुढे लिहत रहावे व आपले स्वयंभू विचार आम्हा विचार आम्हा वाचकांपुढे ठेवत रहावेत ह्यासाठी आपणाला शुभेच्छा !
प्रसन्न शेंबेकर
http://www.majhikavita .blogspot.com
वा ! तुम्ही नुसत्याच चाली लावत नाही तर मराठी भावसंगीत आणि एकूणच संगीत या विषयावर सखोल विचार करता आणि ते विचार इतक्या उत्तम रितिने शब्दांत उतरवू शकता हे पाहून आनंद झाला. अलिकडच्या काळात काही खरोखरच गुणी संगीतकार मराठीत उदयाला आले आहेत आणि येत आहेत. तुमचं ‘गीतकारां’ बद्दलचं मत पटलं. माझ्यामते ‘गीतलेखन’ या प्रकाराला मराठी ‘साहित्यात’ मध्यंतरीच्या काळात गौण स्थान दिलं गेलं. जुन्या काळात ‘मुक्तछंद’ काव्याला जशी सापत्न वागणूक दिली गेली तशीच काहिशी वागणूक ‘नवकवीं’ च्या पिढीने ‘छंदबद्ध’ काव्याला आणि कवींना दिली. त्यातूनच वृत्त-छंदात लिहिणं हे ‘कृत्रीम’ मानलं जाऊ लागलं. ‘मुक्त’ लिहिलं तरच ते ‘प्रामाणिक’ मानलं जाऊ लागलं आणि जे लोक मात्रा-छंद इत्यादि प्रयोग करु पाहत होते त्यांना त्यापासून परावृत्त केलं गेलं.
अपेक्षा करुयात की हे चित्र यापुढे पालटेल.
तुमचा मराठी आणि इंग्रजी ब्लॊग पाहून आनंद झाला.