RSS

मराठी अभिमानगीत – एक संवाद

04 Apr

अमिताभ बच्चन यांनी सत्कार केला

मराठी अभिमानगीत प्रकाशित झाल्यानंतर त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि तो अखंडित सुरू आहे. किंबहुना वाढतोय. अगदी कविवर्य शंकर वैद्यांपासून संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्यापर्यंत, लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर ते जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत गोडबोले यांच्यापर्यंत, शाहिर विठ्ठल उमपांपासून सुलेखनकार अच्युत पालवांपर्यंत आणि माझ्या मित्राचा इंग्रजी माध्यमात शिकणारा ११ वर्षांचा मुलगा ते थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक अनेक लोकांनी या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आणि करताहेत.

जसं कौतुक आलं तसेच अनेक हिणकस शेरे, टीका, टिंगल, नापसंती, अगदी अपमानसुद्धा… यांनाही तोंड द्यावं लागलं. इंटरनेटवर चाळचाळता सहज sureshbhat.inवर एक पोस्ट वाचायला मिळाला. तो पोस्ट आणि त्याला लिहिलेलं उत्तर असं दोन्ही मी खाली नमूद करत आहे. कौतुक झालं की सर्वांनाच बरं वाटतं पण टीका झोंबते… जिव्हारी लागते. पण ही टीका बाजूला सारून पुन्हा नव्या जोमाने आपण आपला विश्वास असलेल्या कामात पुन्हा बुडून जातो. त्या पोस्टला माझं हे उत्स्फूर्त उत्तर आहे. त्यावेळी जे मनात आलं ते मी उतरवलं आहे.

अजय अनंत जोशी यांचा पोस्ट

अजय अनंत जोशी [08 मार्च 2010]

गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?
“हे मराठी अभिमानगीत आहे. हे कॉलरट्यून म्हणून सेट करा.” मला असा रोज एस.एम.एस.येत आहे. हे अभिमान गीत आहे हे लोकांना वाटले पाहिजे ना? जबरदस्ती कशाला…?
टीप : या गाण्यात नाविन्यपूर्ण काय आहे हा संशोधनाचा विषय आहे…:)

माझं उत्तर

प्रिय अजयजी,

आपण म्हणता गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?

याचं आधी आपल्याला उत्तर देतो. आपण जे दोन-दोन शब्द वापरले आहेत, त्या प्रत्येक दोन शब्दांमागे माझे आणि माझ्या सहकार्‍यांचे अपार कष्ट आहेत. तुम्ही म्हणता ‘गाणे झाले’. आमच्यासाठी अजयसाहेब हे दोन शब्द म्हणजे दीड वर्षांचा कालावधी होता. अपार कष्ट, मेहनत आणि जबस्दस्त इच्छाशक्तीच्या बळावर झालेलं हे कदाचित जगातलं सर्वात भव्य गीत आहे. या आधी जगात असा दाखला नाही की ११२ प्रस्थापित कलाकार एकत्र आले आंणि त्यांनी एका गीतात आपला सहभाग नोंदवला. ३५६ लोकांचं समूहगान हे अख्ख्या भारतामध्ये याआधी कधीही ध्वनिमुद्रित केलं नव्हतं. आज एव्ही मॅक्स या मासिकाने एक “जागतिक दर्जाचं ध्वनिमुद्रण” म्हणून या गीताला मान्यता दिली आहे. या गाण्यामुळे प्रथमच ५००हून अधिक कलाकार एकत्र आले आहेत आणि हे मराठीत होतंय. ही तुमच्यासाठी “नाविन्यपूर्ण” गोष्ट नसेल कदाचित… माझ्यासाठी आहे!

टाळ्या वाजवल्या. या दोन शब्दांचं मोल कदाचित तुम्हाला कळणार नाही अजयजी! या गाण्याच्या प्रकाशन समारंभाला तब्बल ८००० लोक उपस्थित होते. यापूर्वी कुठल्याही ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनासाठी इतका मोठा जनसमुदाय महाराष्ट्रात एकत्र आल्याचं निदान मला तरी आठवत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा शंभरहून अधिक कलाकारांनी हे गीत गायलं तेव्हां १६००० ओले डोळे आपल्यावर रोखले असणं म्हणजे काय, हा अनुभव या शंभर कलाकारांसाठी काय होता हे तुम्ही त्यांनाच विचारा. हे गाणं संपल्यावर १० सेकंद नीरव शांतता पसरली आणि ८००० लोकांचा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे उठून उभा राहिला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ह्या टाळ्या फुकट आल्या नाहीत जोशीसाहेब! यासाठी अश्रु, घाम, आणि आयुष्यातलं दीड वर्ष केवळ आणि केवळ आपल्या मातृभाषेसाठी देणारे अनेक माझे सहकारी होते.

पुढे काय? जोशीसाहेब, तुम्ही रेडियो ऐकता का? पुण्याच्या रेडियो मिर्चीचं धोरण होतं की नवीन मराठी गाणी आपल्या वाहिनीवर लावायची नाहीत. या गाण्यापासून त्यांनी हे आपलं धोरण बदललं. मुंबईमध्ये तर अजिबात मराठी गाणी लागत नसत. या गीतापासून बिग एफ.एम. या वाहिनीने मराठी गाणी नियमितपणे लावायला सुरुवात केली. ह्या गाण्यामुळेच व्होडाफोन कंपनी ज्यांचं मराठीत बोलाणार नाही असं धोरण होतं, त्यांना ते बदलावं लागलं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. अमेरिकेतून मला अनेक फोन आणि ई-मेल आले की अमेरिकेत जन्माला आलेली मराठी कुळातली मुलं आनंदाने हे गाणं ऐकताहेत, गाताहेत. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या एका तमिळ मुलीने या गीताबद्दल आपल्या ब्लॉगवर लिहितांना म्हटलंय की हे गीत ऐकल्यावर मला मी महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान तर वाढलाच, पण कौशल आणि त्याच्या सहकार्‍यांची आपल्या मातृभाषेबद्दल असलेली तळमळ पाहून माझ्या मातृभाषेशी पुन्हा एकदा नाळ जुळली.
नाविन्यपूर्ण काय? संगीत म्हणून हे दर्जेदार आणि उत्तम आहे असं पं. सुरेश तळवलकर, अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, हरिहरन, शंकर महादेवन, पद्मभूषण श्रीनिवास खळे (ज्यांनी गाणं ऐकून माझ्या खिशात पाचशे रुपयाची नोट जबरदस्ती कोंबली) आणि इतर अनेक लोक म्हणालेत. अमिताभ बच्चन यांनाही या गाण्याची मोहिनी पडलीच ना! मला एकदा खुद्द पु.ल.देशपांडे म्हणाले होते, “कौशल, तू चांगलं करत रहा, नवीन आपोआप घडेल!” मी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जातोय, जोशीसाहेब!
जबरस्ती कशाला? जोशीसाहेब आपण लोकशाहीत राहतो. तुमची मोबाईल सेवा त्यांच्या पद्धतीने या गाण्याचा प्रसार करतेय! कोणाचीही जबरदस्ती नाही की तुम्ही हे गीत कॉलरट्यून म्हणून लावावं! अनेक अशा जाहिराती तुम्ही पचवताच की एरवी. आणि तुमच्या माहितीसाठी मोबाईल कंपन्यांना आदेश दिला की असे जाहिरात करणारे एस.एम.एस. बंद करा तर ते ऐकतात की तुमचं! जबरदस्तीचा प्रयत्न येतोच कुठे!!

शेवटी जोशीसाहेब, तुमच्याच शैलीत मी तुम्हाला देखिल विचारू शकतो – “टीका केलीत, टिंगलही केलीत. पुढे काय?” पण मी तसं करणार नाही. तुम्ही या गाण्याचा हिस्सा आहात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. मी आधीही म्हटलं होतं (तुम्ही सहभाग नोंदवायच्याही आधी) की या गाण्यामुळे काय फरक पडेल मला नाही सांगता येणार, पण हे एक पहिलं पाऊल आहे जे मी उचलू शकतो. ते मी उचललं. या गाण्यात काय नाविन्यपूर्ण आहे, काय नाही याचं संशोधन आपण करावं. आपण याच्यापेक्षा निश्चितच जास्त काहीतरी केलं असेल म्हणून इतक्या अधिकाराने (आणि माफ करा, पण थोड्या हिणकस पद्धतीनेही) आपण या गाण्याच्या मूल्याबद्दल लिहिलं आहे. मला तूर्तास इतकंच ठाऊक आहे की माझ्या कुवतीप्रमाणे, अतिशय प्रामाणिक असं पाऊल मी उचललेलं आहे. आणि ते मी शेवटपर्यंत निभावणार आहे. ते तुमच्या पसंतीस उतरलं नसेलही पण हे गाणं ज्यांना आवडलं आहे आणि ज्यांच्यामध्ये मराठीचा अभिमान या गाण्याने पुन्हा चेतवला आहे, त्या लोकांची कास धरून मला हा प्रवास पुढे असाच चालू ठेवायचा आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

कौशल


 

About kaushal s. inamdar

सूर मागू तुला मी कसा जीवना तू तसा, मी असा - कवीवर्य सुरेश भट

11 Responses to मराठी अभिमानगीत – एक संवाद

  1. देवेंद्र चुरी

    एप्रिल 4, 2010 at 3:09 सकाळी

    कौशलजी कोणी काहीही म्हणो..पण तुमच्या हया सबंध उपक्रमाला कोणाच्या दाखल्याची गरज आहे अस वाटत नाही…महाराष्ट्रातील तमाम जनतेने तुमच्या कामाची योग्य ती पावती तुम्हाला दिली आहेच….असो आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा….

     
  2. सौरभ

    एप्रिल 4, 2010 at 3:26 सकाळी

    दादा, Whatever you have done is larger than life… कोणालाही हेवा वाटेल असं. मी मी म्हणणारे अनेकजण तुमच्या ह्या कर्तुत्वापुढे फिके पडले असतिल. असो. हे टक्केटोमणे मारणारे भेटतिलच. कारण जे तुम्ही केलय त्याबद्दल एक अंशदेखिल माहिती नसेल हे नक्की. पण आता मराठीच्या ईतिहासात “दोन” सुवर्णाक्षरांची भर पडली आहे… “कौशल ईनामदार” आणि आम्हाला त्याचा खुप खुप गर्व आहे… आणि अभिमान गीताबाबत तुमच्यावर केलेली टिका/अपमान हे निव्वळ तुमचे नसतिल. मराठीला “मातृ”भाषा मानणाऱ्या सर्वांवर असेल. त्याला सगळे मिळून उत्तर देतिल…

     
  3. शांतीसुधा

    एप्रिल 4, 2010 at 8:22 सकाळी

    खूपच छान उत्तर लिहिलं आहे कौशलदा. मला यावरून एक गोष्ट आठवली. एक माणूस खेकडयांची पिशवी घेउन चाललेला असतो. पण पिशवीचं तोंड उघडं असतं. एक जण त्याला विचारतो की अरे तू जर पिशवीचं तोंड बंद केलं नाहीस तर सगळे खेकडे बाहेर पडतील. तो माणूस उत्तर देतो, असं होणं शक्यच नाही. निदान खेकड्यांच्या बाबतीत तरी नाही कारण खेकडे हे एक मेकांचे पाय ओढतात. एखादा पुढे जायला लागला की त्याचे पाय ओढतात. हाच खेकड्याचा गुणधर्म मराठी माणसाच्या बाबतीत खरा आहे असं मी कुठेतरी वाचलं होतं. आज त्याची खात्री पटली. लोक हळूहळू सुधारतील अशी आपण फक्त आशाच करू शकतो.

     
  4. प्रमोद देव

    एप्रिल 4, 2010 at 10:10 सकाळी

    शाबास कौशल. अतिशय संयत आणि तरीही परखड अशा भाषेत आपण आपली प्रतिक्रिया नोंदवलेय.
    गीत खरोखरंच सुंदर झालंय…ह्याबद्दल दूमत असण्याचे काही कारणच नाही.
    ह्या गीतासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान केलेय त्या आपण आणि आपल्या सर्व साथीदारांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

     
  5. वैशाली शिरोडकर

    एप्रिल 4, 2010 at 10:19 सकाळी

    नमस्कार कौशल….
    त्यांचा प्रश्न आणि तुझं उत्तर दोन्हीहि वाचलं. आपल्याकडे हि प्रथाच आहे कि एखादा काहि चांगलं करत असेल तर त्याचे पाय ओढून त्याला पाडायचं तरी किंवा टीका तरी करायची.
    त्यामुळे त्यात काही नवीन नाही.. आणि “निंदकाचे घर असावे शेजारी..” हेही तेव्हढंच खरं आहे ना??
    एखाद गोड पदार्थ करतांना त्याची चव आणखी छान लागावी म्हणून चिमूटभर मीठ घालतो ना तसंच हे आहे..
    अशा गोष्टी फार मनावर घ्यायच्या नसतात, कारण आपलं कामच आपल्यापेक्षा जास्त बोलतं…..
    त्यामुळे तू तुझं काम करत रहा… आम्हां सर्वांना तुझा अभिमान आहे…

     
  6. shailaja

    एप्रिल 4, 2010 at 11:20 सकाळी

    कौशल दादा तुम्हाला सलाम. खरेच खूप छान काम केले आहे तुम्ही. आणि मला वाटते या अशा लोकांचे मनाला लागून घेण्यापेक्षा तुमच्याबरोबर सगळी मराठी माणसे आहेत हे कायम लक्षात ठेवा. अर्थात अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाहि त्याचेच हे उदाहरण. आम्हाला अभिमान आहे मराठी असल्याचा आणि मराठी अभिमान गीताचा. नावातच सर्व आहे.

     
  7. Shekhar

    एप्रिल 4, 2010 at 9:19 pm

    कौशल, मराठी अभिमान गीत आहेच सुरेख आणि तुम्ही ते छान present केले आहे. सर्व दिग्गजांच्या वेळा मिळवून final composition करणे हे वाटते तेवढे सोपे नाहीच, त्यात तुमचे कष्ट दिसतात…तुमचे मन:पूर्वक अभिनंदन..मिडिया हे प्रबोधनाचे उत्तम साधन आहे आणि तुम्ही त्याचा योग्य वापर केलात…तुम्ही मराठी माणसाला एकत्र आणलंत.. एका गीतात गुंतवलत…..something common जे मराठी माणूस गातोय /गुणगुणतोय …त्याचे श्रेय तुम्हाला…. त्याला केवळ मराठी अभिमान गीत न म्हणता महाराष्ट्र गीत म्हणायला हवे.
    जोशी साहेबांच्या मताविषयी मी थोडे बोलेन…म्हणजे सकारात्मक विचार केला तर तुम्ही सर्वाना एकत्र आणले…पण त्यांचे दुखः ह्याच्या पुढे आहे कदाचित…केवळ मराठी गाणे बनवून काय होणार ? असे त्यांना वाटते…तुम्ही दिलेले दाखले हे योग्य उत्तर आहे…मी बोलेन हि सुरवात आहे…आता थांबू नका ….इतर भाषिकांप्रमाणे (दक्षिण भारतीय)….मराठी माणसाने आता मराठी भाषा जोपासली पाहिजे….वाढवली पाहिजे..सुरुवात अर्थातच मराठीत बोलून करायला हवी…ह्या प्रक्रियेत थोडा वेळ जाईल खरा पण येणाऱ्या पिढीसाठी हि आपली जबाबदारी आहे हे विसरता कामा नये….पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन आणि आभार…..

     
  8. anirudhacool

    एप्रिल 4, 2010 at 11:16 pm

    आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा….

     
  9. रोहित कुलकर्णी

    एप्रिल 5, 2010 at 6:53 pm

    प्रिय कौशलजी,
    तुमच्या अभिमानगीताचा अभिमान सर्व मराठीजनांना आहे… त्या साठी “जोशी” साहेबांच्या प्रतिक्रियांची गरज नाही.. आपण असल्या संकुचित “आजोबांच्या ” प्रतिक्रियांकडे अजिबात लक्ष देऊ नये व व्यथित होऊ नये.. आज खऱ्या अर्थाने जातींच्या विळख्यात हरवलेल्या मराठी माणसाला ह्या गीताने एकत्र आणल. आज कौतुकाने हे गीत पुन्हा पुन्हा आम्ही ऐकतो आणि अंगावर रोमांच फुलून येतात…. सर्व जातीभेद विसरून आज मराठी लोकांनी ह्या गीताचा स्वीकार केला आहे आणि पुढील पिढ्यांमध्ये निनादात राहील ह्याची शंकाच नाही( त्याची आम्ही काळजी घेऊ)

    आता @ “जोशीबुवा”: काय आहे,जोशींना हे माहित आहे का की नाविन्यता ही स्वीकारली तरच त्यात नाविन्यतेचा अर्थ कळतो…डोळ्याला झापड लावलीत तर समोर जग कालच दिसत….तुमच्या टाळ्यांची अपेक्षा इथे कोण करतो.. हो तुमची उपेक्षा मात्र नक्की होईल :) … मला वाटत सुरेश भटांना सुद्धा तुमच्या सारखा आगाऊ “जोशी” भेटला असेल म्हणूनच त्यांनी एवढ्या अप्रतिम कवितेचा शेवट “अपुल्याच घरी हाल सोसते मराठी” असा केला असेल..आणि तुम्ही कॉलरट्यून काय सेट करणार ह्यावर ह्या गाण्याचा दर्जा ठरत नाही… आता तरी सुधारा जोशी बुवा, खूप मागे पडत चाललो आहे आपण… मराठीत प्रत्युत्तर देऊन आणि नवीन गोष्टींचा स्वीकार न करता आपण अभिमानाची एक नवी पातळी आखून दिली आहे… पण मला खात्री आहे, जर तुम्ही पुणेकर असाल आणि तुमचा मुलगा / मुलगी जर खरी पुणेकर असेल तर तुम्हाला हे गाणं सारखा ऐकण्याचा जाच होईल हे नक्की… आपण कसले संशोधन करता हे तरी कळू द्या….म्हणजे आपली पात्रता कळेल…तुमची मत पेन्शन घेऊन घरी आराम करताना आपल्या परिचित व नातेवाईकांना ऐकवा, नको तिथे चोम्बडेपण करून जोशी नावाला त्रास देऊ नका नाहीतर काही दिवसांनी आम्ही “जोशी” दिसला की हे गाण वाजवू…
    - एका पक्क्या पुणेकर कुलकर्ण्याकडून अभिमानाची थाप (जोशींना वेगळी आणि कौशल इनामदार ह्यांना वेगळी) …

     
  10. ram sontakke

    जुलै 24, 2010 at 4:00 pm

    mitra ajay jhoshi gann zaall pudhe kay?
    yach uttar 1 agustla milel radio tar aykat aasalch tumhi

     
  11. prashant sagwekae, news anchor, sahara samay, mumbai

    जानेवारी 13, 2011 at 8:05 pm

    लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.. आपल्या मातीचा,मातृभाषेचा सार्थ अभिमान शब्दरुप करणारं हे गीत आणि त्या गीताला कौशलदा तुझं लाभलेलं संगित म्हणजे मराठी संगित क्षेत्रातला एक ठेवाच म्हणावा लागेल.. कोण काय म्हणतं ? याहीपेक्षा या गीताल तमाम मारठी आणि अमराठी लोकांनी सुद्धा दिलेली पोचपावतीच सगळं काही सांगून जाते.. तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा…

     

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.