मनात माझ्या

मनाला उजळून टाकते ती दिवाळी

पानी पे चमकती शामें

पुन्हा दिवाळी उंबरठ्यावर आहे. दिवाळी जवळ आली की मन नॉस्टॅल्जिक होतं. जुन्या आठवणी येरझारा घालु लागतात. मला दिवाळी आठवते ती गोव्यात घालवलेली. गोव्यातली नर्कचतुर्दशी पाहण्यासारखी असते. पणजीच्या चौकात गोव्यातल्या विविध गावांमधुन तयार करून आणलेले नर्कासुरांचे पुतळे मिरवले जातात. लहान असताना ही पणजीतली दिवाळी मी अनुभवली आहे. आमच्याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका वयस्क ब्रिटिश जोडप्याबरोबर मी पणजी फिरायला गेलो. नर्कासुराची कथा त्या जोडप्याला सांगीतली तेव्हा त्यांनाही त्या उत्सवामागची भूमिका समजली आणि मौज कळली. फेरीमधून जातांना किनाऱ्यावरच्या दिव्यांमुळे लुकलुकणारं पाणी अजून माझ्या मनात ओलावा बनून राहिलं आहे. त्या एका स्मृतीचित्राने मला बरंच काही सुचवलं आहे.

संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा

कुरळ्या लहरींमधुनी

शीळ घालतो वारा

या पाडगांवकरांच्या कवितेला चाल देतांना गोव्याची हीच रात्र माझ्या डोळ्यासमोर तरळली होती. त्यानंतर जेव्हा मी लिहिलं होतं –

पानी पे चमकती शामें

हम रहते हैं दिल को थामे

और तेरी यादों के ठंडे साये

रहते हैं मन पे छाये

तेव्हासुद्धा गोव्यातल्या दिवाळीची संध्याकाळ माझ्या मनात साठून राहिली होती. शेवटी मनाला जी उजळून टाकते ती खरी दिवाळी, नाही का?

कौशल श्री. इनामदार

एका चालीची गोष्ट

कुठल्या ही संगीतकाराला ‘हे तुम्हाला कसं सुचतं हो?’ या प्रश्नाला आयुष्यात कधी न कधीतरी सामोरं जावच लागतं. बहुतेक वेळा या प्रश्नाचं उत्तर त्या संगीतकाराकडे तयार नसतं आणि मग तो ‘यात माझं काही नाही…. ही परमेश्वराची कृपा आहे…’ किंवा या सारखं काही विनयशील असं उत्तर देऊन मोकळा होतो. मला नेहमी वाटतं की आपल्याला कधी कधी इतकं सुचतं… काही बरं, काही चांगलं, काही सामान्य आणि काही वाईट… आणि बराच काळ असा ही जातो की ज्या काळात काही सुचत देखिल नाही. तर या सगळ्याची जबाबदारी उगीचच त्या विधात्यावर का बरं ढकलावी?! आपल्या सामान्य आणि वाईट चालींची ही जबाबदारी त्याच्यावर लादणं जरा अन्यायकारकच नाही का?

पण विचार केला तर हा प्रश्न खरच अस्वस्थ करणारा आहे. एखादी चाल नेमकी कशी सुचते? काहीच अस्तित्वात नसतं आणि अचानक अवकाशाच्या पटावर सूर उमटतात आणि एक स्वरचित्र तयार होतं. पण हे सगळं खरंच इतकं अद्भुत आहे का? आपल्याच मनात घडणारी सृजनाची प्रक्रिया आपल्याला नेमकी कळू नये हे मनाला पटत नाही आणि आपण त्या चालीचा मूळ स्रोत शोधण्याच्या यात्रेवर निघतो.

देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।

सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर ते या सृजानाच्या क्षणांइतकंच सुख देऊन जातं याचा मला अनुभव आहे. अशा काही क्षणांचा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडेल.

ग्रेस यांची ‘या व्याकुळ संध्यासमयीं…’ या कवितेला चाल देण्याचा योग आला. कविता वाचली आणि मी भांबावुन गेलो.

या व्याकुळ संध्यासमयीं

शब्दांचा जीव वितळतो

डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे

मी अपुले हात उजळतो

पं. यशवंत देव म्हणतात की कविता समजल्या शिवाय चाल देऊ नये. या निकषावर तर इथे कठीण होतं! पण कविता कळली नसली तरी ती जाणिवेच्या पातळीवर आपला परिणाम साधत होती. डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं, एक वातावरण मनात तयार झालं. शब्दातून थोडी हूरहूर जाणवत होती. मला पहिल्या ओळीची चाल सुचली. ती अहिर भैरव रागाच्या सुरावटीच्या आसपास घोटाळत होती. ‘डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे‘ म्हणताना मी आपसूक वरचा ‘सा’ लावला. पूर्ण चाल झाल्यावर माझ्या मनातली हूरहूर वाढली होती, ती गूढ, अनामिक बेचैनी अधिक तीव्रपणे गाण्यामधे जाणवत होती.

मी विचार करू लागलो. ही चाल मला अशीच का सुचली असेल? संध्याकाळचं गीत होतं – पण ते वाचत असताना ही माझ्या मनात अहिर भैरवची सुरावट का रूंजी घालत होती? अहिर भैरव हा पहाटे गायचा राग असून सुद्धा?

मला आठवलं की एकदा मी आजारी होतो आणि जो रात्री झोपलो तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाग आली. संधिप्रकाश होता आणि मला कळेना आता उजाडणार आहे का अंधारणार आहे. त्या क्षणांपुरता राहिलेला जो संभ्रम आणि गूढ अशी अस्वस्थता त्या अहिर भैरवच्या सुरांतुन व्यक्त होत होती. बेचैनी होती पण ती अनामिक होती, त्यावर सहज बोट ठेवता येत नव्हतं. कदाचित चालीमधे मारव्याचे सूर डोकावणं जास्त स्वाभाविक झालं असतं, बेचैनी ही जाणवली असती पण ती गूढ आणि सहजासहजी न उलगडणारी वाटली नसती. आणि सकाळचे राग संध्याकाळी ऐकताना मला कायम ही अनामिक बेचैनी जाणवत आली आहे.

‘रेन रागा’ नावाचा एक फ्युजन शो मी केला होता. त्यामधे पाऊस पडायच्या अगोदरचं चित्र एका धुनेतून व्यक्त करायचं होतं. पाचच मिनिटात चाल लागली. नंतर विचार केला तेव्हा लक्षात आलं की पाऊस पडायच्या अगोदरचं चित्र – असा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहिलं होतं… खडकाळ प्रदेश आहे… सूर्य मध्यान्हीला आलाय… लो ऍन्गल कॅमेऱ्यातुन तो आपल्याला दिसतोय… घामाच्या धारा वाहत आहेत. आणि हेमा मालिनी काचांच्या तुकड्यांवर नाचते आहे ! त्याबरोबरच सूर्य मध्यान्हीला आलाय…. असं जेव्हा आपल्या डोक्यात आलं तेव्हा आपल्याला पं. कुमार गंधर्वांनी निर्माण केलेल्या ‘मधसुरजा’ या रागाची ही आठवण झाली होती.

…. आणि आपण केलेल्या चालीवर या दोन्ही सुरावटींची छाया होती. हे आपसूक घडलं होतं. त्याचा विचार चाल देण्याच्या आधी झाला नव्हता.

असा तर्क करा. तुम्ही पावसाळ्यात कोकणात फिरायला गेले आहात. संध्याकाळ होते. तुम्हाला चहाची तल्लफ येते. तुम्हाला रस्त्यावर एक चहाची टपरी दिसते. तुम्ही गाडीतून उतरता आणि अचानक एक जोराची सर येते. तुम्ही भिजत भिजत टपरी पर्यंत जाता. शेगडीवर एक अनुभवी पातेलं आहे ज्यावर चहाचं आधण चढवलं आहे. त्यातून मस्त, गरम वाफा येत आहेत. समोर संधिप्रकाशात एक कौलारू घर दिसतंय्‍. त्यात एक कंदील पेटलाय. संपूर्ण परिसर अतिशय रम्य दिसतोय्‍. तुम्ही तो डोळ्यांत साठवून घेताय. आणि त्याच वेळी त्या चहाच्या टपरीवरचा जो रेडियो आहे, त्या मधे विविधभारती वर ‘फिरकीवाली तू कल फिर आना, नहीं फिर जाना तू अपने जबान से… कि तेरे नैना है जरा बईमान से…‘ खरं तर त्या गाण्याचा आणि त्या दृश्याचा काडीचा संबंध नसतो पण ते गाणं त्या दृश्याचा एक घटक बनून जातं.

बराच काळ उलटतो आणि तुमच्यावर एका पावसातल्या गीताला चाल देण्याची वेळ येते. तेव्हा आपसूक ‘फिरकीवाली…’ चे सूर तुमच्या सुरावटीमधे मिसळून जातात!

एका अर्थाने आपण नवीन काहीच करत नसतो. मार्क ट्वेन ने म्हटलय्‍ –

“Only Adam, when he said a good thing, knew that nobody had said it before him!”

पण तरीही वेगवेगळ्या चाली निर्माण होतच रहातात. आपल्याला त्यातलं नाविन्य जाणवत राहतं. घराघरात मटकीची उसळ होते पण चव सगळीकडची वेगळी असते कारण त्या गृहिणीच्या हाताची (काही सुखी कुटुंबांमध्ये गृहस्थाच्या!) चव त्यामधे उतरते. तसंच एखद्या गीताची चाल ही आपल्या संस्कारातून आली असेल पण आपल्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श तिला होतो आणि चाल नवीन होऊन जाते !

© कौशल श्री. इनामदार

हा लेख ‘प्रहार’ या दैनिकात ११ ऑक्टोबर २००८ रोजी छापून आला होता

क्षितिज जसें दिसतें…

क्षितिज जसें दिसतें

तशी म्हणावी गाणीं…

ग्रेसांचं लिखाण मला नेहमी गूढ वाटत आलं आहे, पण अनाकलनीय कधीच नाही. कविता ‘कळली’ नाही तरी जाणीवेच्या पातळीवर त्यांच्या कविता आपला परिणाम साधतात असं मला नेहमी वाटत आलं आहे. माझी पहिली मराठीतली चाल ग्रेसांच्या कवितेला लागली यांचं मला आता दहा वर्षांनंतर अजिबातच नवल वाटत नाही. ती कविता होती ‘पाऊस कधीचा पडतो‘. चाल लागण्याची क्रिया ही ग्रेसांच्या कवितेइतकीच गूढ होती असं म्हणायला हरकत नाही.

मी, त्या काळी, रूपारेल कॉलेज मधे होतो… नाटकाने झपाटलेला. नाटकाच्या निमित्ताने संगीतामधल्या काही लोकांशी संबंध आला होता. त्यात कमलेश भडकमकर, अजित परब, ओंकार दादरकर, तनुजा जोग, शिल्पा पै ही सगळी मंडळी होती. मग नाटक सोडून आम्ही इतर ही बराच वेळ एकत्र घालवायचो. असंच एकदा रूपारेलच्या कँटीन मधे बसून कमलेश भडकमकर आणि मी चहा पीत होतो. आणि मी सहज गुणगुणलो…

“पाऊस कधीचा पडतो

झाडांची हलती पानें

हलकेच जाग मज आली

दु:खाच्या मंद सुराने…”

कमलेशचे कान टवकारले.

“हे काय गातोय्‍स?” त्याने विचारलं.

“माहित नाही,” मी उत्तरलो, “गाणं आहे… बऱ्यापैकी लोकप्रिय आहे ना? मला या दोनच ओळी माहित आहेत.”

कमलेश म्हणाला, “शब्द बरोबर आहेत… पण चाल चुकीची गातोय्‍स. यशवंत देवांची चाल आहे याला.”

त्याने मला यशवंत देवांची चाल ऐकवली. मग तो पुढे म्हणाला –

“पण तू गात होतास ते ही चांगलं लागत होतं… तू पुढे करत का नाहीस ही चाल?”

मी घरी जाऊन माझ्या वडिलांच्या संग्रहातलं ‘संध्याकाळच्या कविता’ हे पुस्तक काढलं आणि या कवितेला चाल दिली. ती सुरावट कशी सुचली, अजून मला कळलेलं नाही. मला अजून ही वाटतंय‍्‍ की मी ती कुठेतरी, कधीतरी ऐकली असावी. असो. पण त्या मुळे मी एक मराठी संगीतकार झालो एवढं मात्र खरं. ती चाल माझ्या मित्रांना, घरच्या लोकांना ऐकवली आणि सगळ्यांनीच मला प्रोत्सान दिलं. माझ्या वडिलांनी मला या चाली निमित्त विल्यम गोल्डिंगचं ‘लॉर्ड ऑफ द फ्लाइज’ हे पुस्तक ही भेट दिलं. आणि त्यानंतर झपाटल्यासारखं मी कवितांना चाली देत सुटलो.

पुढे काही दिवसांनी याच पुस्तकाची प्रस्तावना असावी अशी कविता – ‘क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी‘ – याला देखिल मी चाल लावली. कविता वाचली तेव्हा त्याचा अर्थ काहीच कळेना. यशवंत देवांचं म्हणणं असतं की कविता कळल्या शिवाय त्याला चाल देऊ नये. त्या निकषावर तर इथे कठीण होतं! पण मी कविता न कळताच चाल द्यायला सुरुवात केली आणि मला एक नवा अनुभव आला. तो असा की गाता गाता ती कविता मला उलगडत होती. ‘क्षितिज जसें दिसतें तशी म्हणावी गाणी‘ या ओळीचा अर्थ मला कळत नव्हता पण हळूहळू उलगडत होता. आपल्याला आपल्या खिडकीतून जसं आणि जितकं क्षितिज दिसतं तशी गाणी म्हणावी असा थोडासा भाबडा पण खरा वाटणारा अर्थ मला कळला होता. त्यानंतर काही वर्षे गेली आणि एके दिवशी खुद्द ग्रेस यांचाच मला फोन आला.

“माझ्या कवितांना तुम्ही छान चाली दिल्या आहेत असं मी ऐकलं, तेव्हा मला त्या ऐकण्याची इच्छा आहे.” – इति ग्रेस.

मला आनंद, भय, काळजी (स्वत:ची), हुरहूर, अशा विविध भावना एका वेळी अनुभवायला मिळाल्या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच ते संध्याकाळी माझ्या घरी येऊन ठेपले. घरी मित्रांची दाटी झाली होती ग्रेसना पहाण्यासाठी. ग्रेस काय बोलतायत‍्‍ याकडे सर्वांचं लक्ष होतं.

माझी सगळी गाणी शांतपणे ऐकून घेतली आणि म्हणाले:

“खरोखरच चांगल्या चाली दिल्यात की तुम्ही. यातली ‘विराट घुमटातुनी‘ ची चाल तुम्ही मला रेकॉर्ड करून द्या.”

मग ते आपणहून त्यांच्या कवितांबद्दल बोलू लागले आणि जमलेले सर्व चाहते त्या बोलण्यात रंगून गेले. पुढे चर्चा त्यांच्यावर होणाऱ्या ‘दुर्बोधते’च्या आरोपावर गेली. त्यावर ते म्हणाले:

“काय दुर्बोध वाटतं माझ्या लेखनात? आणि तुम्हाला ग्रेस दुर्बोध वाटतो तर काय ज्ञानेश्वर सुबोध वाटतो? ‘क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी‘ यात काय दुर्बोध आहे?”

त्यांनी ती म्हणताक्षणी मला ती ओळ स्पष्ट दिसू लागली. खरंच्‍, यात आपल्याला काय वाटलं जे कळलं नाही? का इतकं साधं आपल्या लक्षात आलं नाही? त्यांनी ती ओळ उच्चारल्यावर आणखी ही काही संदर्भ स्पष्ट झाले. या ओळी मधे आपलं गाणं आपल्या दृष्टीशी आणि अंतर्दृष्टीशी प्रामाणिक असावं असा ही संकेत होता. एका क्षणातच मला माझ्या कलेकडे पहाण्याचा एक दृ्ष्टिकोन मिळाल्यासारखं वाटलं. खरं तर याच अर्थाचं पण यापेक्षा थोडं ढोबळ आणि (पाडगांवकरांच्या चाहत्यांची माफी मागून – ज्यात माझा ही समावेश आहे) थोडं कमी aesthetic विधान मंगेश पाडगांवकरांनी ही आपल्या कवितेमधून केलं होतं.

गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे

ज्याचे खरे न गाणे तो बेइमान आहे.

मंगेश पाडगांवरांच्या ओळीं मधून कलेविषयी एका ठराविक मूल्याबद्दल माहिती मिळते किंवा पाडगांवकरांचं त्याविषयीचं मत कळतं. पण ग्रेस यांच्या ओळींमधून कलेविषयीच्या याच मूल्याबद्दल एक अंतर्दृष्टी मिळते. ग्रेस यांच्या ओळीमध्ये अनेक शक्यता दडल्या आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कवितेमधे उलगडत रहाण्याची क्वॉलिटी आहे. आज ही या ओळी वेगवेगळ्या रूपात माझ्यासमोर येतच राहतात, आणि स्वत:ला उलगडत राहतात. आणि क्षितिज अधिकाधिक रुंद होत जातं…

© कौशल श्री. इनामदार, २००७.

Published in: on ऑगस्ट 21, 2007 at 7:41 सकाळी प्रतिक्रिया (20)