RSS

‘अर्थ’शून्य भासे मज…

सुमारे बारा वर्षांपूर्वीची कथा आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स्‍’ मध्ये मी केलेल्या पहिल्या अल्बमचं – शुभ्र कळ्या मूठभरचं – परीक्षण आलं होतं. त्यात पत्रकाराने –

“या ध्वनिफीतीला किर्लोस्कर आणि फिनोलेक्स उद्योग समूहांनी मदत करून सुद्धा पन्नास रुपये ही किंमत जरा जास्त वाटते.- ”

असं लिहिलं होतं. मी जरा खट्टू झालो. पहिली गोष्ट – ध्वनिफीतीमध्ये एरवीच्या आठ गाण्यांऐवजी अकरा गाणी होती. दुसरी गोष्ट – या उद्योग समूहांनी मदत का केली होती आणि किती आणि कुठल्या स्वरूपाची केली होती ते काही पत्रकाराला माहित नव्हतं. आणि तिसरी आणि माझ्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पत्रकाराने काही ती ध्वनिफीत विकत घेतली नव्हती ! त्याला मीच ती दिली होती !

मी माझा पहिला अल्बम करायचा ठरवला तो क्षण उत्साहाचा होता. शान्ताबाई शेळके यांच्या रचनांवर आधारित ‘शुभ्र कळ्या मूठभर’ हा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर घेतलेला हा निर्णय होता. या निर्णयात मित्रांच्या, आप्तांच्या उत्साहाचा गुणाकार होत गेला आणि हालचालींना वेग आला. ‘शुभ्र कळ्या मूठभर’ची संपूर्ण जन्मगाथा अतिशय रोचक आहे, तरी वो कहानी फिर सही! एक अल्बम तयार करून रसिकांसमोर येईपर्यंतच्या अर्थकारणा संबंधी मी घेतलेले काही अंबटगोड अनुभव, एवढेच आज मी मांडणार आहे.

एका अल्बमचं ध्वनिमुद्रण करण्यासाठी काय खर्च येईल याचा हिशोब मांडू लागल्यावर हळुहळू त्या उत्साहात आश्चर्य, भीती, काळजी, अविश्वास, अशा वेगवेगळ्या भावनांच्या रंगांची मिसळण सुरू झाली. स्टुडियोचे दर तासावर असतात… व्यावसायिक गायक – वादक एकेका गाण्याचे चार आकडी पैसे घेतात… अशा उत्साहावर पाणी सोडणाऱ्या गोष्टी कळू लागल्या.

एखादी कॅसेट कंपनी शान्ता शेळकेंच्या रचनांची ध्वनिफीत करायला सहज तयार होईल अशी एक भाबडी आशा मनाशी बाळगून एका निर्मात्यासाठी शोधयात्रेचा प्रारंभ झाला. पण लवकरच सत्यपरीस्थितीची जाणीव होऊ लागली. ‘कोण शान्ता शेळके?’ इथपासून ‘त्यापेक्षा तुम्ही कोळीगीतं करा… त्यांना जास्त चांगला खप असतो.’ पर्यंत – अशी निरनिराळी वाक्य कानावर पडू लागली आणि शेवटी कंपनीच्या नादी न लागता आपणच या ध्वनिफीतीची निर्मिती करावी असं ठरलं.

रेकॉर्डिंग करण्यासाठी आम्हाला थोडी आर्थिक मदत किर्लोस्कर आणि फिनोलेक्स उद्योगसमूहाने केली. आणि पं. सत्यशील देशपांडे यांच्या संवाद फाऊंडेशनने त्याला हातभार लावला. अल्बम मध्ये एकूण अकरा गीतं होती आणि काही आमच्याच मित्रमंडळींनी तर काही गीतं पं. सत्यशील देशपांडे, साधना सरगम, शोभा जोशी अशा व्यावसायिक कलाकारांनी गायली. संपूर्ण अल्बम साठ हजार रुपयांमध्ये तयार करण्याची सर्कस आम्ही शेवटी एकदाची पार पाडली.

साठ हजार रुपये फक्त मास्टर कॅसेट बनवण्याचा खर्च. आता येणार होता ध्वनिफीतींच्या प्रतींचा खर्च !  त्यावेळी सीडी मराठी मध्ये इतक्या प्रचलित नसल्यामुळे कॅसेटच काढयचं ठरलं. तरी एका कॅसेटला साधारण १५ रुपये खर्च येणार होता. हा खर्च कॅसेटमधल्या टेपची प्रत आणि लांबी यावर ठरत असे. शिवाय इनले कार्ड आणि कॅसेटवर केलेली छपाई. ३००० प्रती छापल्या तर १५रुपयांप्रमाणे ४५००० रुपये. यात ६०००० रुपये म्हणजे १,०५,००० रुपये असा खर्च या ३००० प्रतींचा आला. शिवाय कॅसेटच्या प्रकाशनाचा समारंभ, रीटेलर आणि डिस्ट्रिब्युटर यांची दलाली, असे सगळे खर्च धरले तर कॅसेटची किंमत किमान रु. ७५ ठेवली तर ३००० विकल्यावर नुकसान होणार नाही अशी परीस्थिती होती. तरी इतकी किंमत नको… ५० रुपयांपर्यंत करू आणि पुढच्या आवृत्तीच्या वेळी नुकसान भरून काढू असा निर्णय घेण्यात आला.

त्या पत्रकाराने ध्वनिफीतीच्या किंमतीवर लिहिल्यावर मला थोडा राग जरूर आला होता, पण जसा काळ लोटत गेला आणि मी संगीताकडे व्यवसाय म्हणून पाहू लागलो तसं मला मराठी ध्वनिमुद्रित संगीताच्या अर्थकारणाबद्दल लोकांमध्ये आणि कलाकारांमध्ये ही किती अज्ञान आहे हे उमगत गेलं.

आज ही परीस्थिती बदलली असली तरी फार बरी नाही. जी परीस्थिती बदलली आहे ती जास्त निर्मितीच्या स्तरावर बदलली आहे. पण मार्केटिंग आणि डिस्ट्रिब्युशन ही क्षेत्र अजून अंधारातच आहेत.

शुभ्र कळ्या मूठभर नंतर मी आणखीन एक अल्बम केला होता. त्याची निर्मिती ही मीच केली. या अल्बम मध्ये हौशी असे गायक कोणीच नव्हते. निर्मितीप्रक्रीयेतच अडीच – तीन लाख रुपये खर्च आला होता. ती एका मल्टी-नॅशनल ऑडियो कंपनीच्या पदाधिकाऱ्याने ऐकुन मला बोलावलं.

“आमची कंपनी तुझा अल्बम मार्केट करेल. तुला १० टक्के रॉयल्टी देऊ.” अशी त्याने घोषणाच करून टाकली.

मी विचारलं – “पण तुम्ही तुमच्या बाजूने काय करणार? व्हीडियो करणार का? जाहिरात करणार का?”

तो पदाधिकारी हसला. “मराठी साठी हे सगळं परवडत नाही. मागे अमुक अमुक कलाकाराचा अल्बम आम्ही केला आणि दहा हजार प्रती ही नाही खपल्या.”

हा अमुक अमुक कलाकार माझ्यापेक्षा अधिक नावाजलेला आणि अनुभवी होता. माझ्या मनात विचार आला – आणि मी तो त्या पदाधिकाऱ्याला बोलून दाखवला.

“माझ्यापेक्षा अधिक नावाजलेल्या कलाकाराच्या अल्बमच्या तुम्ही दहा हजार प्रतीच विकल्यात, तर माझ्या अल्बमच्या किती विकाल? पण आपण असं धरून चालू की दहा हजार प्रती विकल्यात तरी दहा टक्क्यां प्रमाणे जास्तीत जास्त तुम्ही मला पन्नास हजार रुपये द्याल – तेही एका वर्षभराच्या काळात. मला खर्च आला आहे अडीच लाख रुपये. अगदी नफा नाही झाला तरी खर्च केलेले पैसे परत मिळावे अशी माझी किमान अपेक्षा आहे. तरच मी माझा पुढचा अल्बम करू शकतो.”

“तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आमच्या कंपनीची हीच पॉलिसी आहे” –  असं म्हणत त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या पदाधिकाऱ्याने मला रामराम ठोकला.

आज वैयक्तिक पातळीवर निर्मिती करू पाहणारे मराठी भावसंगीतामध्ये अभावानेच सापडतात. आणि एकदा निर्मिती करणारे दुसऱ्यांदा त्याच्या वाटेला जात नाहीत. किंवा गायक, संगीतकार, हे त्यांना प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूने एखाद्या अल्बमची निर्मीती करतात. पण व्यवसाय म्हणून ते याकडे पाहत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे.

या मध्ये इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारे संगीत, पायरेटेड एम्पी ३ सीडीज्‍, रेडियो (आणि रेडियोकडून न मिळणारी रॉयल्टी) या सगळ्या कारणांचा समावेश आहे. पण माझ्या दृष्टीने प्रमुख कारण हे चांगल्या आणि प्रामाणिक वितरण व्यवस्थेचा अभाव. मोठ्या कंपन्या ज्यांची वितरण व्यवस्था जागेवर आहे, आ वासून छोट्या निर्मात्यांना गिळंकृत करायला बसल्या आहेत.

आता ही परवाचीच गोष्ट. एक निर्माता मराठी भावगीतांची सीडी घेऊन एका मोठ्या ऑडियो कंपनीकडे गेला. त्याला ध्वनिमुद्रण प्रक्रीयेत साधारण तीन लाख रुपये खर्च आला आहे. कंपनीचे अधिकारी त्याला म्हणाले.

“सीडी उत्तम आहे तुमची. आम्ही त्याचं मार्केटिंग करायला तयार आहोत. आपण १५० रुपये किंमत ठेऊया. तुम्हाला आम्ही दहा टक्के रॉयल्टी देऊ. फक्त तुम्हाला आमच्याकडून कमी दरात – म्हणजे १०० रुपयात सीडीच्या २००० प्रती विकत घ्याव्या लागतील !”

म्हणजे रतन टाटांना इंडिका चालवायची असेल तर ती त्यांना वासन मोटर्स मधून विकत घ्यावी लागणार !

एवढं करून सुद्धा एक ठराविक प्रकारच्या संगीतालाच या कंपन्या मान्यता देतात. पण प्रत्येक संगीतकारालाच काही ‘कोंबडी’च्या मागे धावायचं नसतं आणि प्रत्येक श्रोत्याला काही तेच संगीत ऐकायचं नसतं. वेगवेगळया संगीताची आवड असणारे समाजात आहेत, पण एखाद्या व्होट बँक प्रमाणे ऑडियो कंपन्यांना एक ठराविक संगीत ऐकणारा श्रोताच (बहुतेक वेळा प्रेक्षक) अपेक्षित असतो.

एकूण संगीताच्या ध्वनिमुद्रिकांचा उद्योग हा अंधेर नगरी – चौपट राजा या धरतीवर चालला आहे यात शंका नाही. पण या अशा परीस्थितीमुळेच कमलेश भडकमकर सारख्या एखाद्या संगीत संयोजकाला वाटतं की पर्यायी संगीतप्रकारही लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि तो स्वत:ची ऑडियो कंपनी सुरू करण्यास प्रवृत्त होतो. आणि गरज हीच आहे, एका मधल्या संस्थेने हे ठरवू नये की संगीतकाराने काय प्रकारचे संगीत करावे आणि श्रोत्यांनी कोणत्याप्रकारचे संगीत ऐकायला हवे. संगीतकार आणि श्रोत्यांमध्ये थेट संवाद व्हावा.

मार्गात अडथळे खूप आहेत पण संगीतकार आणि श्रोत्यांमधून अडथळा निर्माण करणारी वितरणव्यवस्था बदलली तर मराठी ध्वनिमुद्रित संगीताला एक नवा ‘अर्थ’ नक्की सापडेल.

 

2010 in review

The stats helper monkeys at WordPress.com mulled over how this blog did in 2010, and here’s a high level summary of its overall blog health:

Healthy blog!

The Blog-Health-o-Meter™ reads Wow.

Crunchy numbers

Featured image

A Boeing 747-400 passenger jet can hold 416 passengers. This blog was viewed about 4,000 times in 2010. That’s about 10 full 747s.

 

In 2010, there were 4 new posts, growing the total archive of this blog to 16 posts. There were 2 pictures uploaded, taking up a total of 140kb.

The busiest day of the year was June 30th with 310 views. The most popular post that day was खिडकीएवढे आभाळ.

Where did they come from?

The top referring sites in 2010 were kaushalsinamdar.com, facebook.com, marathiblogs.net, musicandnoise.blogspot.com, and mr.wordpress.com.

Some visitors came searching, mostly for kavi gress, संगीतकार, kavi grace, क्षितिज, and मराठी संगीतकार.

Attractions in 2010

These are the posts and pages that got the most views in 2010.

1

खिडकीएवढे आभाळ June 2010
3 comments

2

मराठी अभिमानगीत – एक संवाद April 2010
10 comments

3

क्षितिज जसें दिसतें… August 2007
21 comments

4

मराठी अभिमानगीताचा प्रवास – भाग १ April 2010
6 comments

5

लागले मन परतीच्या वाटेवरती January 2010
1 comment

 
 

खिडकीएवढे आभाळ

(हा लेख ‘सकाळ’ मध्ये ‘गुड मॉर्निंग’ या सदरात दि. ३० जून रोजी छापून आला आहे.)

हे सगळे लेख मी माझ्या खोलीत संगणकावर लिहितो. समोर संगणकाचा स्क्रीन आणि उजव्या हाताला एक खिडकी असं एकंदर नेपथ्य या सगळ्या लेखनप्रक्रियेला लाभलेलं आहे. जरा कंटाळा आला किंवा सुचेनासं झालं की मी या खिडकीबाहेर एक नजर टाकतो. तिथे एक पारंब्या असलेलं झाड आहे. ते वडाचं नाही इतकंच मला त्या झाडाबद्दल ठाऊक आहे. त्या झाडापलिकडे एक इमारत आहे आणि या इमारतीच्या काही खिडक्यांतली दुनिया मला बसल्या जागीच अनुभवता येते.

खरं तर माझ्या खोलीतली ही खिडकी म्हणजे इंग्रजी चित्रपटातल्या जिप्सी बायकांकडे जसा एक क्रिस्टल बॉल असतो तशीच मला भासते.

आज मी लिहायला बसलो पण काहीच सुचेना म्हणून मी खिडकी बाहेर बघत बसलो आणि त्या खिडकीबाहेरच्या जगात रमलो. पुन्हा एकदा नजर संगणकाकडे वळवली पण पुन्हा काहीच सुचेना आणि मग पुन्हा तोच उद्योग! घड्याळाचे काटे फिरत राहिले पण आज कशावर लिहावं असा एक विषय सुचेना. आणि खिडकीच्या बाहेर एकदा नजर गेली की त्याबरोबर मन कुठे कुठे फिरून यायचं. मग वाटलं की कशाला एक ठराविक विषय घ्यावा? मनाच्या हातात बोट द्यावं आणि ते नेईल तिथे फिरून यावं… तेच या संगणाकाच्या स्क्रीनवर टिपून घ्यावं.

खिडकीबाहेरच्या झाडाला या दिवसात नवीन पालवी फुटते आणि ते पुन्हा एकदा हिरवं गार होतं. मग या दिवसात पक्ष्यांचे आवाजही एरवीपेक्षा अधिक जवळ ऐकू येतात. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये या झाडाच्या पानांवरचा प्रकाश बदलत जातो आणि पानांच्या रंगांच्या नानाविध छटा पाहायला मिळतात. रात्री मात्र अंधाराबरोबर आकारांचं जग नाहिसं होतं आणि खिडकीबाहेर सावल्यांचं एक निराकार जग निर्माण होतं.

अनेकदा रात्री या खिडकीतून बाहेर बघतांना मला कुसुमाग्रजांची ‘झाड’ ही कविता आठवते.

एकदा

मध्यरात्रीच्या नीरवतेतून

मी ऐकला होता एक भयानक चीत्कार

पलिकडच्या परसात असलेल्या

एका वृक्षाच्या काळ्याशार पानघुमटातून

उफाळलेला….

देव जाणे काय घडले असेल त्या पानांच्या दुनियेमध्ये…

खरंच… देव जाणे काय घडत असतं त्या पानांच्या दुनियेमध्ये. सावल्या हलतांना सगळा परिसर रात्री जागा झालाय असं वाटू लागतं. पण पुन्हा सकाळ होते आणि खिडकीबाहेरचं जग सगुण-साकार होतं. समोरच्या इमारतीच्या खिडक्याही उघडतात. माणसांचे दिवसभराचे व्यवहार सुरू होतात आणि हीच खिडकी ऍल्फ्रेड हिचकॉकच्या ‘रियर विंडो’चे रूप धारण करते. समोरच्या घरातल्या सामान्य माणसांचे व्यवहारही नाट्यमय भासू लागतात!

या खिडकीबाहेर मी तासन्‍ तास बघत बसू शकतो. जितकं अवकाश या खिडकीतून दिसतं, त्यातूनच एक नवीन जग निर्माण होतं… अशी ही जादूची खिडकी. खिडकीला गज आहेत तरी ते मनाला विहार करण्यापासून रोखू शकत नाहीत. विखुरलेले विचार, आठवणी, गाणी, कविता यांची एक माळ गुंफली जाते आणि अशात शांताबाई शेळकेंचे शब्द आठवतात…

तसे सारेंच रोजचे ऋतू फुलती फुलती

रंग रंग ओलसर निळ्या आभाळावरती…

आज खिडकी एवढे मला पुरते आभाळ

शुभ्र कळ्या मूठभर आणि गुंफिलेली माळ!

कौशल श्री. इनामदार

ksinamdar@gmail.com

 

मराठी अभिमानगीताचा प्रवास – भाग १


आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वात अधिक कधी होते? खूप चालून पाय दुखू लागले की जशी पायांच्या अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव होते तशी एरवी कधीच होत नाही! पडसं झालं की नाकाच्या अस्तित्त्वाची जाणीव, बोट चिमटलं की बोटाच्या अस्तित्त्वाची जाणीव! तसंच जेव्हां माझी अस्मिता दुखावली गेली तेव्हां मी एक मराठी माणूस, एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली.

एका जिंगलच्या ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने मी मुंबईमधल्या एका व्यावसायिक रेडियो वाहिनीच्या (एफ.एम्‍ स्टेशन) स्टुडियोमध्ये गेलो होतो. काम झाल्यावर तिथे माझा मित्र असलेल्या एका रेडियो जॉकीला अगदी सहज विचारलं –

“काय रे, तुमच्या वाहिनीवर मराठी गाणी का नाही लागत?”

“आमची पॉलिसी आहे.” त्याने उत्तर दिलं.

“तुमची महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी गाणी लावण्याची पॉलिसी आहे?!” मी आश्चर्याने विचारलं.

त्याने मान डोलावली.

“अशी पॉलिसी तुमची भारताच्या कुठल्या इतर शहरामध्ये आहे? कोइमतूरमध्ये तमिळ गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे? बेंगळूरूमध्ये कन्नड गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे? कोलकात्यामध्ये बंगाली गाणी लावणार नाही, अशी पॉलिसी आहे?”

“अरे, मुंबईची गोष्ट वेगळी आहे मित्रा!” त्याने मला समजावलं. “मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे.”

“मान्य आहे ना. कॉस्मोपॉलिटन बेंगळुरूही आहे! पण तिथे कन्नडा गाणी लागतात की. कारण बेंगळुरू कर्नाटकाची राजधानी आहे. तसं मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग इथे मराठी गाणी लावायची नाहीत, असं धोरण तुम्ही अवलंबता?”

पहिल्यांदा माझा मित्र निरुत्तर झाल्यासारखा झाला. मी पुढे म्हणालो –

“तुम्ही हिंदी गाणी लावता, आणि त्याचा आनंद आहेच आम्हाला. तुम्ही पंजाबी गाणी लावता, याचाही आनंद आहे. पण पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन आणि मराठी ते व्हर्नॅक्युलर हा न्याय कुठला? म्हणजे रब्बीचं ‘बुल्ला की जाणां’ तुम्हाला चालतं, पण सलील-संदीपच्या ‘डिबाडी डिबांग’चं तुम्हाला वावडं का?”

हे ऐकल्या नंतर मात्र त्या रेडियो जॉकीने शस्त्र खाली ठेवली. तो म्हणाला –

“अरे खरं सांगायचं तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांना असं वाटतं की मराठी गाणी लावली तर रेडियो स्टेशनला एक ‘डाउनमार्केट फील’ येईल.”

इथे मात्र मी चमकलो. ‘डाउनमार्केट फील’? मराठी मुळे? एखादी भाषा ‘डाउनमार्केट’ असते असं ठरवण्याचा अधिकार या तथाकथित वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणी दिला? आणि मराठी डाउनमार्केट म्हणजे हास्यास्पद विधान होतं!

युनेस्कोच्या एका सर्व्हेनुसार जागात सुमारे ६५०० भाषा आणि बोली भाषा आहेत. यात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषा क्रमवार लावल्या तर एन्कार्टा विश्वकोशाप्रमाणे मराठीचा क्रमांक पंधरावा आहे. पंधरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आकडेवारीच्या जोरावरच ‘डाउनमार्केट’ कशी असू शकते? इतकंच नव्हे, तर काही वर्षांपूर्वी अमेरिकाच्या ‘नासा‘ या संस्थेने ‘व्होयेजर‘ नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं. त्या यानातून पृथ्वीवरच्या संस्कृतीची नोंद करणारी एक ‘ग्रामोफोन रेकॉर्ड’ अंतराळात पाठवण्यात आली आहे. या ध्वनिमुद्रिकेचा हेतू हा की परग्रहावरल्या जीवांना पृथ्वी आणि तिच्या संस्कृतीची माहिती उपलब्ध व्हावी. या ‘गोल्डन रेकॉर्ड‘मध्ये परग्रहवासीयांच्या नावे एक संदेश ध्वनिमुद्रित केला गेला आहे. हा संदेश जगाच्या ५५ भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केला आहे, ज्यामध्ये भारतातल्या ९ भाषा आहेत. या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. (मराठीमधला हा संदेश तुम्ही इथे ऐकू शकता!)

इथेच ही कथा संपत नाही. याच ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये पृथ्वीतलावरचं संगीतही ध्वनिमुद्रित करून पाठवलं आहे. जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यातल्या संगीताचा यात समावेश आहे. अमेरिका, मेक्सिको, जर्मनी, अज़रबैजान, पेरू, चीन,बल्गेरिया, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया, अशा विविध देशांमधलं संगीत या ध्वनिमुद्रिकेत आहे. यात भारताच्या संगीताचं प्रतिनिधित्व केसरबाई केरकर करतात. त्यांची बंदिश – ‘जात कहाँ हो’ – ही या ध्वनिमुद्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

तात्पर्य काय – तर जिथे ‘नासा’ला अंतराळातही कुणी परग्रहवासी मराठी समजू शकेल असं वाटतं, तिथे महाराष्ट्राच्या राजधानीतच “तुमची भाषा ‘डाउनमार्केट’ वाटेल” असं म्हणणार्‍या या रेडियोच्या ‘वरिष्ठ’ अधिकार्‍यांचा मला मनस्वी राग आला! बरं, मराठी गाणी महाराष्ट्रात ऐकायची नाहीत तर कुठे आसाममध्ये ऐकायची?!

त्या रेडियोजॉकी मित्राशी फार वाद न घालताच मी बाहेर पडलो आणि मला आढळलं की ही परिस्थिती मुंबईत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये अशीच आहे. मुंबईमध्ये व्होडाफोनसारख्या मोबाईल कंपन्या मराठीतून बोलायला नकार देत होत्या. पुण्यामधल्या रेडियो वाहिन्या नवी मराठी गाणी वाजवायला नकार देत होत्या. चित्र विदारक होतं!

मुंबईमधली परिस्थिती अधिक बिकट होती आणि आहे. आज मुंबईमध्ये आपल्याला भाजीपाला मराठीतून विकत घेता येत नाही की एका जागेहून दुसर्‍या जागी मराठीतून जाता येत नाही! म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही!

प्रश्न फक्त मुंबईचाही नव्हता. मराठी लोकांमध्येच मराठी भाषेच्या बाबतीत एक औदासिन्य आहे, असं प्रकर्षाने जाणवत होतं. मुळातच मराठी ‘डाउनमार्केट’ आहे, हा संकेत इतर भाषकांपर्यंत पोचतो तरी कुठून? कुणाकडून? आणि उत्तर येतं – आपल्याकडून! आणि धोक्याचा इशारा तेव्हाच असतो जेव्हा आपल्यालाच आपली भाषा डाउनमार्केट आहे असं वाटू लागतं.

माझ्या मनात विचार आला की आपण राजकारण्यांना शिव्या घालतो, सरकारच्या नावाने ठणाणा करतो, पण या सगळ्या प्रश्नाबाबत आपण काय करतोय? असा आत्मपीडाकारक प्रश्न सतत मला भेडसावत राहिला. पण मी काय करू शकत होतो? मी संगीतकार आहे आणि मी गाणं करू शकतो एवढंच एक सत्य माझ्या डोळ्यासमोर दिसत राहिलं.

इतर भाषकांना “मराठीचा आदर बाळगा” असं सांगण्याअगोदर खरी गरज होती ती मराठी माणसांच्या मनात मराठीचा अभिमान रुजवण्याची. मराठीला गरज होती एका अभिमानगीताची!


 

 
11 प्रतिक्रिया

Posted by on एप्रिल 19, 2010 in Uncategorized

 

मराठी अभिमानगीत – एक संवाद

अमिताभ बच्चन यांनी सत्कार केला

मराठी अभिमानगीत प्रकाशित झाल्यानंतर त्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि तो अखंडित सुरू आहे. किंबहुना वाढतोय. अगदी कविवर्य शंकर वैद्यांपासून संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्यापर्यंत, लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर ते जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ प्रशांत गोडबोले यांच्यापर्यंत, शाहिर विठ्ठल उमपांपासून सुलेखनकार अच्युत पालवांपर्यंत आणि माझ्या मित्राचा इंग्रजी माध्यमात शिकणारा ११ वर्षांचा मुलगा ते थेट महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक अनेक लोकांनी या गाण्याचं भरभरून कौतुक केलं आणि करताहेत.

जसं कौतुक आलं तसेच अनेक हिणकस शेरे, टीका, टिंगल, नापसंती, अगदी अपमानसुद्धा… यांनाही तोंड द्यावं लागलं. इंटरनेटवर चाळचाळता सहज sureshbhat.inवर एक पोस्ट वाचायला मिळाला. तो पोस्ट आणि त्याला लिहिलेलं उत्तर असं दोन्ही मी खाली नमूद करत आहे. कौतुक झालं की सर्वांनाच बरं वाटतं पण टीका झोंबते… जिव्हारी लागते. पण ही टीका बाजूला सारून पुन्हा नव्या जोमाने आपण आपला विश्वास असलेल्या कामात पुन्हा बुडून जातो. त्या पोस्टला माझं हे उत्स्फूर्त उत्तर आहे. त्यावेळी जे मनात आलं ते मी उतरवलं आहे.

अजय अनंत जोशी यांचा पोस्ट

अजय अनंत जोशी [08 मार्च 2010]

गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?
“हे मराठी अभिमानगीत आहे. हे कॉलरट्यून म्हणून सेट करा.” मला असा रोज एस.एम.एस.येत आहे. हे अभिमान गीत आहे हे लोकांना वाटले पाहिजे ना? जबरदस्ती कशाला…?
टीप : या गाण्यात नाविन्यपूर्ण काय आहे हा संशोधनाचा विषय आहे…:)

माझं उत्तर

प्रिय अजयजी,

आपण म्हणता गाणे झाले. सर्वांनी ऐकले. स्टेजवर पाहिले. टाळ्या वाजवल्या. पुढे काय?

याचं आधी आपल्याला उत्तर देतो. आपण जे दोन-दोन शब्द वापरले आहेत, त्या प्रत्येक दोन शब्दांमागे माझे आणि माझ्या सहकार्‍यांचे अपार कष्ट आहेत. तुम्ही म्हणता ‘गाणे झाले’. आमच्यासाठी अजयसाहेब हे दोन शब्द म्हणजे दीड वर्षांचा कालावधी होता. अपार कष्ट, मेहनत आणि जबस्दस्त इच्छाशक्तीच्या बळावर झालेलं हे कदाचित जगातलं सर्वात भव्य गीत आहे. या आधी जगात असा दाखला नाही की ११२ प्रस्थापित कलाकार एकत्र आले आंणि त्यांनी एका गीतात आपला सहभाग नोंदवला. ३५६ लोकांचं समूहगान हे अख्ख्या भारतामध्ये याआधी कधीही ध्वनिमुद्रित केलं नव्हतं. आज एव्ही मॅक्स या मासिकाने एक “जागतिक दर्जाचं ध्वनिमुद्रण” म्हणून या गीताला मान्यता दिली आहे. या गाण्यामुळे प्रथमच ५००हून अधिक कलाकार एकत्र आले आहेत आणि हे मराठीत होतंय. ही तुमच्यासाठी “नाविन्यपूर्ण” गोष्ट नसेल कदाचित… माझ्यासाठी आहे!

टाळ्या वाजवल्या. या दोन शब्दांचं मोल कदाचित तुम्हाला कळणार नाही अजयजी! या गाण्याच्या प्रकाशन समारंभाला तब्बल ८००० लोक उपस्थित होते. यापूर्वी कुठल्याही ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनासाठी इतका मोठा जनसमुदाय महाराष्ट्रात एकत्र आल्याचं निदान मला तरी आठवत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा शंभरहून अधिक कलाकारांनी हे गीत गायलं तेव्हां १६००० ओले डोळे आपल्यावर रोखले असणं म्हणजे काय, हा अनुभव या शंभर कलाकारांसाठी काय होता हे तुम्ही त्यांनाच विचारा. हे गाणं संपल्यावर १० सेकंद नीरव शांतता पसरली आणि ८००० लोकांचा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे उठून उभा राहिला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. ह्या टाळ्या फुकट आल्या नाहीत जोशीसाहेब! यासाठी अश्रु, घाम, आणि आयुष्यातलं दीड वर्ष केवळ आणि केवळ आपल्या मातृभाषेसाठी देणारे अनेक माझे सहकारी होते.

पुढे काय? जोशीसाहेब, तुम्ही रेडियो ऐकता का? पुण्याच्या रेडियो मिर्चीचं धोरण होतं की नवीन मराठी गाणी आपल्या वाहिनीवर लावायची नाहीत. या गाण्यापासून त्यांनी हे आपलं धोरण बदललं. मुंबईमध्ये तर अजिबात मराठी गाणी लागत नसत. या गीतापासून बिग एफ.एम. या वाहिनीने मराठी गाणी नियमितपणे लावायला सुरुवात केली. ह्या गाण्यामुळेच व्होडाफोन कंपनी ज्यांचं मराठीत बोलाणार नाही असं धोरण होतं, त्यांना ते बदलावं लागलं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. अमेरिकेतून मला अनेक फोन आणि ई-मेल आले की अमेरिकेत जन्माला आलेली मराठी कुळातली मुलं आनंदाने हे गाणं ऐकताहेत, गाताहेत. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या एका तमिळ मुलीने या गीताबद्दल आपल्या ब्लॉगवर लिहितांना म्हटलंय की हे गीत ऐकल्यावर मला मी महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान तर वाढलाच, पण कौशल आणि त्याच्या सहकार्‍यांची आपल्या मातृभाषेबद्दल असलेली तळमळ पाहून माझ्या मातृभाषेशी पुन्हा एकदा नाळ जुळली.
नाविन्यपूर्ण काय? संगीत म्हणून हे दर्जेदार आणि उत्तम आहे असं पं. सुरेश तळवलकर, अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, हरिहरन, शंकर महादेवन, पद्मभूषण श्रीनिवास खळे (ज्यांनी गाणं ऐकून माझ्या खिशात पाचशे रुपयाची नोट जबरदस्ती कोंबली) आणि इतर अनेक लोक म्हणालेत. अमिताभ बच्चन यांनाही या गाण्याची मोहिनी पडलीच ना! मला एकदा खुद्द पु.ल.देशपांडे म्हणाले होते, “कौशल, तू चांगलं करत रहा, नवीन आपोआप घडेल!” मी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जातोय, जोशीसाहेब!
जबरस्ती कशाला? जोशीसाहेब आपण लोकशाहीत राहतो. तुमची मोबाईल सेवा त्यांच्या पद्धतीने या गाण्याचा प्रसार करतेय! कोणाचीही जबरदस्ती नाही की तुम्ही हे गीत कॉलरट्यून म्हणून लावावं! अनेक अशा जाहिराती तुम्ही पचवताच की एरवी. आणि तुमच्या माहितीसाठी मोबाईल कंपन्यांना आदेश दिला की असे जाहिरात करणारे एस.एम.एस. बंद करा तर ते ऐकतात की तुमचं! जबरदस्तीचा प्रयत्न येतोच कुठे!!

शेवटी जोशीसाहेब, तुमच्याच शैलीत मी तुम्हाला देखिल विचारू शकतो – “टीका केलीत, टिंगलही केलीत. पुढे काय?” पण मी तसं करणार नाही. तुम्ही या गाण्याचा हिस्सा आहात आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. मी आधीही म्हटलं होतं (तुम्ही सहभाग नोंदवायच्याही आधी) की या गाण्यामुळे काय फरक पडेल मला नाही सांगता येणार, पण हे एक पहिलं पाऊल आहे जे मी उचलू शकतो. ते मी उचललं. या गाण्यात काय नाविन्यपूर्ण आहे, काय नाही याचं संशोधन आपण करावं. आपण याच्यापेक्षा निश्चितच जास्त काहीतरी केलं असेल म्हणून इतक्या अधिकाराने (आणि माफ करा, पण थोड्या हिणकस पद्धतीनेही) आपण या गाण्याच्या मूल्याबद्दल लिहिलं आहे. मला तूर्तास इतकंच ठाऊक आहे की माझ्या कुवतीप्रमाणे, अतिशय प्रामाणिक असं पाऊल मी उचललेलं आहे. आणि ते मी शेवटपर्यंत निभावणार आहे. ते तुमच्या पसंतीस उतरलं नसेलही पण हे गाणं ज्यांना आवडलं आहे आणि ज्यांच्यामध्ये मराठीचा अभिमान या गाण्याने पुन्हा चेतवला आहे, त्या लोकांची कास धरून मला हा प्रवास पुढे असाच चालू ठेवायचा आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

कौशल


 

लागले मन परतीच्या वाटेवरती

लागले मन परतीच्या वाटेवरती…

‘जान्हवी’ या अल्बमची सगळी गाणी अवधूतने सांगितल्याप्रमाणे अष्टनायिका या विषयावर आधारलेली आहेत. ‘मन परतीच्या वाटेवरती’ हे कलहान्तारिका या नायिकेचं गीत आहे. प्रियकराशी भांडल्यावर पश्चात्ताप झालेली ही नायिका आता व्याकुळ आहे. गुरूने शब्द लिहून दिले आणि त्यावर मी चाल बांधली. चाल झाल्यावर वाटलं की मन परतीच्या वाटेवर आहे हा एक सूफी अध्यात्मिक विचारच आहे. त्यावरून या गीताची सुरुवात एका सूफ़ी गायन वाटेल अशा ओळीने करायचं ठरवलं. गुणगुणता गुणगुणता एक हिंदीत ओळ सुचली ज्याचं यमक मन परतीच्या वाटेवरतीशी जुळले –

कब रूठा लहरों से किनारा, कब रूठी सावन से धरती ?
लागले मन परतीच्या वाटेवरती !

 

कसे जाता लगी!

kase jaata lagi full song

गीत – अशोक बागवे
संगीत – कौशल श्री. इनामदार
गायिका – जान्हवी प्रभू-अरोरा

 
 
Follow

Get every new post delivered to your Inbox.